मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरे यांची सोडली साथ; आता कीर्तिकुमार शिंदे यांनी हाती धरली मशाल
Kirtikumar Shinde : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कीर्तिकुमार शिंदे यांनी आज शिवबंधन बांधले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिंदे यांनी मनसेचे इंजिन सोडले होते. आज त्यांनी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक शिलेदार, नेत्यांनी त्यांच्या भूमिका बदलवल्या. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकले. तर काहींनी वेगळी वाट चोखंदळली. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधले. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
समाज माध्यमावर भूमिका केली जाहीर
‘आज देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे.’ अशा भावना त्यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या.
अनेक वर्षांपूर्वीच्या भेटीचा उल्लेख
त्यांनी या भेटीदरम्यानचा तपशील पण सांगितला.’शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी ‘मातोश्री’ येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांनी मला शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला. मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘भामोशा’ विरोधात परखड भूमिका
यावेळी कीर्तिकुमार शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. हुकूमशाह ‘भामोशा’ विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे घेत असलेले कठोर परिश्रम यांमुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महाविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.