भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड भरारी पथकाने पकडली, निवडणूक काळात आतापर्यंत…

| Updated on: Apr 28, 2024 | 7:12 AM

Mumbai Crime News: देशभरात गेल्या ७५ वर्षांतील सर्वाधिक रक्कम या निवडणूक काळात आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. एकूण ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक काळात प्रचारासाठी रोख रक्कमेची चणचण उमेदवारांना जाणवत आहे.

भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड भरारी पथकाने पकडली, निवडणूक काळात आतापर्यंत...
cash (file Photo)
Follow us on

देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोकड रक्कम, धातू नेले जात आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात गेल्या ४४ दिवसांत ४० कोटींची रक्कम पकडली आहे. ६९.३८ कोटींचे मौल्यवान धातू जप्त केले आहेत. ३५ लाख लिटर दारु, ७९.८७ कोटींच्या अन्य वस्तू असा ४३१.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आता शनिवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री भांडूपमध्ये मोठी कारवाई झाली आहे. भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर कॅशने भरलेली वाहन नाकाबंदी दरम्यान पकडण्यात आली. त्यात तब्बल तीन ते साडे तीन कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे.

मध्यरात्री झाली कारवाई

भांडूप येथील सोनापूर सिग्नलवर रात्री एकच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. यावेळी निवडणूक भरारी पथकाने एक वाहन पकडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वाहनात तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम आहे. ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक देखील दाखल झाले आहे. पथकाने पकडलेल्या कॅशची मोजणी सुरू केली आहे.

ती गाडी एटीएमची वाहतूक करणाऱ्या गाडीसारखी

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करण्याऱ्या गाडीसारखी आहे. परंतु गाडीतील ही रक्कम कुठे जात होती, ती रक्कम कोणाची आहे, यासंदर्भात काहीच उत्तरे गाडी चालकाने दिली नाही. यामुळे हा प्रकार नेमका काय याचा तपास पोलिस करत आहेत. निवडणूक आचारसंहिता सुरु असताना हा प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

देशभरात सर्वाधिक रक्कम

देशभरात गेल्या ७५ वर्षांतील सर्वाधिक रक्कम या निवडणूक काळात आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. एकूण ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक काळात प्रचारासाठी रोख रक्कमेची चणचण उमेदवारांना जाणवत आहे.