‘हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ’, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
"हा निवडणूकन आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असणारा अतिशय नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करतं की काय? असं म्हणायला जरुर वाव आहे", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. या टप्प्यात काही मतदानकेंद्रांवर निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “जिथे आम्हाला मतदान अधिक होतं तिथे आम्हाला तक्रारी येत आहेत. आम्ही वस्तींचे नावं उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करु”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही काही ठिकाणी बोगस घुसवली आहेत, असंही कळलं आहे. पण त्यावर मी आता काही बोलणं योग्य नाही. तूर्त आता जो विलंब लावला जातोय, तुमचं नाव काय, आयडी, तुमच्या भावाचं नाव काय, असं विचारुन विलंब लावला जातोय. तुम्ही मतदान घेता तेव्हा फोन आणू नका, असं सांगाना. फोन आणू नये सांगितलं असेल तरी आतमध्ये जो विलंब लावला जातोय त्याला क्षमा करता येणार नाही. मला तर आता स्पष्ट दिसतंय की, हा निवडणूकन आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असणारा अतिशय नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करतं की काय? असं म्हणायला जरुर वाव आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“जिथे आम्हाला मतं पडत आहेत तिथे हा विलंब लावला जातोय. ही अशी मतदान केंद्र आणि त्यामध्ये असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि प्रतिनिधींची नावे आणा. मी त्यांची नावे उद्या जाहीर करेन. तसेच त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन
“मी नागरिकांना आवाहन करतोय, हा मोदी सरकारचा जो डाव आहे की, तुम्ही मतदानाला उतरु नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसं होईल ते बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रामध्ये जावून उभे राहा. मतदान केल्याशिवाय मतदानकेंद्र बंद होत नाहीत. त्यामुळे पहाटे पाच वाजले तरी मतदानाचा हक्क बजावा. ज्या ठिकाणी निवडणूक अधिकारी, प्रतिनिधी विलंब लावत आहेत, कारण नसताना तुम्हाला छळत आहेत, तुमची आयडी, नावे, ओळखपत्र यावरुन वेळ लावत आहेत, तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
“काही ठिकाणी मतदान यादीत नावे नाहीयत. हे सर्व लोकं पराभावाच्या भीतीने पछाडलेले लोकं आहेत. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. लोकांना करुद्या ना मतदान. मला सुद्धा मेसेज आला आहे की, मतदान करा. एवढं सगळं होऊन लोकं उत्साहात मतदानाला उतरले आहेत. पण आता त्यांना त्रास होतोय. ऊन उतरलेलं आहे. सकाळी जे कंटाळून गेले आहेत त्यांनी पुन्हा मतदानाला जावं. तुमचा मतदानाचा अधिकार बजावा”, असंदेखील आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.