Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले
उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला मतदान करणार आहेत. परंतु हा पंजा काँग्रेसचा आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन कार्य केले आहे. ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्ष मतदान केले, त्या कमळाबाईने देशाची आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सुरु झाले आहे. मुंबईतील सहा जागांवर मतदान होणार आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे मतदान करणार आहेत. यंदा प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख हाताच्या पंज्याला मतदान करतील तर राज ठाकरे दीर्घ कालवधीनंतर धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. त्यावर बोलताना शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे तर राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला मतदान करणार आहेत. परंतु हा पंजा काँग्रेसचा आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन कार्य केले आहे. ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्ष मतदान केले, त्या कमळाबाईने देशाची आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. दुसरीकडे राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार आहे. हा धनुष्यबाण चोरलेला आहे. ते चोरीच्या मालावर हक्क सांगत आहेत. चोरीच्या मालाचे ते चुंबन घेत आहेत. ते नकली व्होट आहे. त्यांना ती सवय आहे. मतदान चिन्ह कोणते आहे? हा प्रश्न नाही. आम्ही देश आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत आला आहोत. उद्धव ठाकरे पंज्याला मतदान करत आहेत, तसे काँग्रेसचे अनेक नेते मशाल आणि तुतारीला मतदान करत आहेत.
राज ठाकरेंना भाजपने भाड्याने घेतले
मनसे प्रमुख राज ठाकरे भाजपसाठी फिरत आहे. सभा घेत आहेत. त्यांनी स्वत:च्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर चांगले दिवस आले असते. कार्यकर्त्यांना आनंद झाला असता. परंतु राज ठाकरे यांच्यासह अनेकांना भाजपने भाड्याने घेतले आहे. राज ठाकरे ज्या मोदी आणि शाह यांचे कौतूक करत आहेत, त्यांनी काय महान दिवे लावले आहेत. कधी मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका, असे राज ठाकरे म्हणत होते. परंतु आता ते चोरीच्या मालाचे समर्थन करत आहेत.
निवडणूक आयोगाने शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली. ही कारवाई मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या कार्यकर्त्यावर केली. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत असे कुठे आहे की मतदारांना मार्गदर्शन करु नये. परंतु निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत आहे.