Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
मुंबईकर कुणाला आपला कौल देतात, याचा फैसला उद्या मतपेटीतून दिला जाणार आहे. प्रामुख्याने मुंबईत शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कारण ६ पैकी ३ जागांवर ठाकरेंचे उमेदवार विरुद्ध शिंदेंच्या उमेदवारांमध्ये सामना आहे. काय आहे मुंबईचं समीकरण आणि ६ खासदार निवडून देणाऱ्या मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? याबाबत माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट!
मुंबईत कुणाचा बोलबाला असणार? मुंबईकर कुणाला कौल देणार? याचा फैसला लवकरच मतपेटीत बंद होणार आहे. तब्बल ६ खासदार आणि 36 आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव शहर आहे. मात्र उत्तर मध्य, दक्षिण पूर्व, ईशान्य अशा नावांमुळे बहुसंख्य मुंबईकरांचा मतदारसंघ सांगताना गोंधळ उडतो. मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाचं असं वर्गीकरण केल्यावरही अनेकांचा संभ्रम होतो. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ शहरांनुसार समजून घेऊयात. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशीचा भाग येतो.
मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच मुंबई ईशान्य मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्दचा समावेश आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या ६ विधानसभा येतात. मुंबई दक्षिण मध्य लोकसभेत अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहिम हे ६ भाग समाविष्ठ आहेत. तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या ६ विधानसभा मतदारसंघ येतात.
मुंबईतल्या सहा मतदारसंघात एकूण 96 लाख 53 हजार 100 मतदार आहेत. त्यापैकी मराठी मतांची संख्या 36 लाख 30 हजार 600 इतकी आहे. गुजराती अधिक राजस्थानी मतं 14 लाख 58 हजार 800 इतकी आहेत. मुस्लिम मतदार 17 लाख 87 हजार इतकी आहेत. उत्तर भारतीय मतदारांची संख्या 16 लाख 11 हजार 400 आणि दक्षिण भारतीय मतदार 6 लाख 97 हजार 600 च्या घरात आहेत.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती?
मुंबई दक्षिण लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांमध्ये लढत होतेय. 15 लाख 20 हजार 600 दक्षिण लोकसभेत एकूण मतदार आहेत. त्यापैकी मराठी मतदारांची संख्या ४० टक्के, गुजराती-राजस्थानी मतदार 18 टक्के, मुस्लिम मतदार 22 टक्के, उत्तर भारतीय 11 टक्के, दक्षिण भारतीय 5 कक्के आणि ख्रिश्चन धर्मियांची मतं 2 टक्के आहेत. आकड्यांमध्ये पाहायचं असेल तर इथं मराठी मतदारांची संख्या 6 लाख 70 हजार, गुजराती-राजस्थानी मतदार 2 लाख 68 हजार, मुस्लिम मतदार 3 लाख 33 हजार, उत्तर भारतीय 1 लाख 71 हजार, दक्षिण भारतीय 72 हजार तर ख्रिश्चनांची 5 हजार मतं आहेत.
मुंबई दक्षिणमध्य लोकसभेत काय परिस्थिती?
मुंबई दक्षिणमध्य लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाईंमध्ये सामना आहे. एकूण मतदार आहेत 14 लाख 38 हजार 100. मराठी मतदार 39 टक्के आहेत. गुजराती-राजस्थानी 9 टक्के, मुस्लिम मतदार 20 टक्के, उत्तर भारतीय 14 टक्के, दक्षिण भारतीय 12 टक्के आणि ख्रिश्चन मतदार 2 टक्के. आकड्यांमध्ये बघितल्यास मराठी मतदार 5 लाख 77 हजार, गुजराती-राजस्थानी मतदार 1 लाख 28 हजार, मुस्लिम मतदार 2 लाख 83 हजार, उत्तर भारतीय 2 लाख, दक्षिण भारतीय 1 लाख 74 हजार, ख्रिश्चन मतदार 28 हजार आहेत.
मुंबई उत्तर मध्य लोकसभेत काय परिस्थिती?
मुंबई उत्तर मध्य लोकसभेत भाजपकडून वकील उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांमध्ये लढत आहे. एकूण मतदार 16 लाख 81 हजार 400, मराठी मतदार 34 टक्के, गुजराती-राजस्थानी 10 टक्के, मुस्लिम मतदार 25 टक्के, उत्तर भारतीय 17 टक्के, दक्षिण भारतीय 7 टक्के, ख्रिश्नन मतदार 5 टक्के आहेत. आकड्यांमध्ये मराठी मतदार आहेत. 5 लाख 67 हजार, गुजराती-राजस्थानी मतदार, 1 लाख 76 हजार मुस्लिम मतदार, 4 लाख 27 हजार उत्तर भारतीय मतदार, 2 लाख 85 हजार, दक्षिण भारतीय मतदार 1 लाख 10 हजार आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 77 हजारांच्या घरात आहे.
मुंबई ईशान्य लोकसभेत काय परिस्थिती?
मुंबई ईशान्य लोकसभेत यंदा भाजपकडून मिहीर कोटेचा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यात सामना आहे. या मतदारसंघात एकूण मतदार 16 लाख 1800 इतके आहेत. इथे मराठी मतदार 45 टक्के, गुजराती-राजस्थानी मतदार 13 टक्के, मुस्लिम मतदार 17 टक्के, उत्तर भारतीय 15 टक्के, दक्षिण भारतीय 6 टक्के, ख्रिश्चन १ टक्के आहेत. आकड्यांमध्ये बघितलं तर मराठी मतदार 7 लाख 26 हजार, गुजराती-राजस्थानी मतदार 2 लाख 10 हजार, मुस्लिम मतदार 2 लाख 73 हजार, उत्तर भारतीय 2 लाख 41 हजार, दक्षिण भारतीय 94 हजार आणि ख्रिश्चन मतं 23 हजार आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत काय परिस्थिती?
मुंबई उत्तर पश्चिम ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून रविंद्र वायकरांना उतरवलं गेलंय. या मतदारसंघात एकूण लोकसंख्या 16 लाख 74 हजार 800 इतकी आहे. मराठी मतदार 35 टक्के आहेत. गुजराती-राजस्थानी मिळून 12 टक्के, मुस्लिम 20 टक्के, उत्तर भारतीय 21 टक्के, दक्षिण भारतीय 7 टक्के आणि ख्रिश्चन मतदार 3 टक्के आहेत. आकडेवारी पाहिलं तर मराठी मतदार आहेत 6 लाख 2 हजार, गुजराती-राजस्थानी मतदार 1 लाख 88 हजार, मुस्लिम मतदार 3 लाख 18 हजार, उत्तर भारतीय 64 हजार, दक्षिण भारतीय 1 लाख 28 हजार आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 41 हजार इतकी आहे.
मुंबई उत्तर लोकसभा काय परिस्थिती?
मुंबईतला सहावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा. इथं भाजपकडून पियूष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होतेय. इथे एकूण मतदार 17 लाख 37 हजार इतके आहेत. मराठी मतांचा टक्का 32 टक्के आहे. गुजराती-राजस्थानी 28 टक्के, मुस्लिम 9 टक्के, उत्तर भारतीय 20 टक्के, दक्षिण भारतीय 7 टक्के, आणि ख्रिश्चन मतदार 3 टक्के आहेत. आकडेवारी पहिल्यास मराठी मतदार 5 लाख 50 हजार, गुजराती-राजस्थानी मिळून 4 लाख 86 हजार, मुस्लिम 1 लाख 50 हजार, उत्तर भारतीय 3 लाख 47 हजार, दक्षिण भारतीय 1 लाख 18 हजार आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या 53 हजार 400 इतकी आहे