लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे. महायुतीचा महापराभव झाला आहे. 2019 मध्ये 41 जागा जिंकणाऱ्या महायुतीला आता केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. त्यावेळी राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजप, 18 जागांवर एकत्र असलेली शिवसेना, 5 जागांवर एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. आता भाजप 9, शिंदे सेना 7 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवर विजयी झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार 12, शिवसेना उबाठाचे उमेदवार 9 जागांवर विजयी झाले आहे. 84 वर्षांचा योद्धा शरद पवार यांनी आपला दम दाखवला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निवडणुकीत मुंबई अन् कोकणमध्ये दोन्ही शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले दिसून येत आहे. यामुळे मुंबईचा बॉस एक शिवसेना नाही तर दोन्ही शिवसेना ठरल्या आहेत.
मुंबईत सर्वात जास्त फटका भाजपला बसला आहे. 2014 मध्ये भाजपला तीन जागा होत्या. आता फक्त एक जागा आहे. 2009 मध्ये मुंबईत सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मागील निवडणुकीत एकही जागा नव्हती. आता वर्षा गायकवाड यांच्या माध्यमातून एक विजय मिळाला आहे. शिंदे सेनेला मुंबईत एका जागेवर तर उद्धव ठाकरे यांचा तीन जागेवर विजय मिळला आहे. उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला आहे.
मुंबई आणि कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पाच उमेदवार उभे केले होते. त्यातील तीन जागा त्यांना मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई आणि कोकणात 9 उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांना तीनच जागा जिंकता आल्या. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त राहिला आहे. मुंबई कोकणात भाजपने पाच जागी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तीन उमेदवार निवडून आले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडची तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भिवंडीची जागा जिंकून कोकणात प्रवेश पक्का केला आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांना शिवसेनेत घेतले. त्यानंतर मिलिंद देवरा यांना खासदारकी दिली. परंतु त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झालेला दिसत नाही.