मुंबई | दि. 6 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौरा मंगळवारपासून सुरु झाला. या दौऱ्यातून अमित शाह यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. एकीकडे या दौऱ्यात महाराष्ट्रातील विरोधक शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्याचवेळी दुसरीकडे महायुतीमधील जागा वाटपाचा वाद मिटवण्यासाठी शिष्टाई केली. अमित शाह यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठकीत व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको, असा सल्ला अमित शाह यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १६ जागा हव्या होत्या. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बैठक घेतली. बैठकीत भाजपकडून झालेले सर्वेक्षण, उमेदवार निवडून येण्याची क्षमता हे मुद्दे लक्षात घेऊन जागा वाटप करण्याचे अमित शाह यांनी सांगितले. भाजप नेते देखील काही जागांसाठी अडून बसले असतील आणि त्या ठिकाणी मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो तर भाजपनेही हट्ट सोडावा. जागा वाटपात कोणावर अन्याय होणार नाही. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असे अमित शाह यांनी सांगितले. ४८ जागा वाटप कसे करायचे यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जागा वाटप न झाल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे समजते. यामुळे येत्या 7 मार्चला भाजपकडून दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत आपल्या पक्षाला लोकसभेच्या १८ जागा मिळाव्यात यासाठीही शिंदे आग्रह होता. राज्यात आपण ऊठाव केलाय आणि सर्व आमदार खासदार सोबत घेऊन पक्ष वाढवत असल्याचंही शिंदे म्हणाले. तसेच निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी आग्रही मागणी एकनाथ शिदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावेळी शाह यांनी त्यांना विविध मतदारसंघात ग्राउंड रिॲलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे काही उमेदवार जिंकणार नाहीत, हे त्यांनी सांगितले. यानंतर शिवसेनेच्या खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर ऊभा ठाकलाय. काही खासदार पुन्हा ऊबाठा गटात जाण्याचाही विचार करत आहेत. तर मित्र पक्षाला जागा दिला तर आपलं काय होणार? असा प्रश्न भाजप उमेदवारांना पडला आहे.