यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार पत्रकार मधू कांबळे यांना जाहीर
यंदाचा पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 19 जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते मधू कांबळे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मधू कांबळे हे दलित, वंचित, कष्टकरी आणि शोषितांबद्दल सातत्याने लिहित आहेत. तसेच राजकीय पत्रकार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या पत्रकारितेचा गौरव म्हणून म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि भारताच्या समाजवादी चळवळीतील एक ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर झाला आहे. ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीतर्फे येत्या 19 जुलै 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री सत्यरंजन धर्माधिकारी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर असतील.
16 जून 2020 रोजी दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजली सभेत, रणदिवे यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकाराला प्रतिवर्षी ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानुसार, 2021 साली जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे, 2022 साली ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर आणि 2023 साली ज्येष्ठ पत्रकार ओल्गा टेलिस यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. यंदा पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. 2024 चा पुरस्कार मधु कांबळे यांना देण्यात यावा असे, या पुरस्कारासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्यावतीने एकमताने ठरवण्यात आले. रु. 25,000 रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर हे असून प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग, हिंदुस्थान टाइम्स (मराठी)चे संपादक हारीस शेख, प्रकाश महाडिक आणि पुष्पा महाडिक हे निवड समितीचे सदस्य आहेत.
मधू कांबळे यांना मिळालेले पुरस्कार
1 ) सन 2000- मुंबई मराठी पत्रकार संघाचा कॉ.तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार
2) सन- 2013- कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता दीपस्तंभ’ पुरस्कार
3) सन-2016-पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार
4) सन- 2019 महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार.