तिढा सुटेना, महाविकास आघाडीच्या बैठकीतील Inside Story, मुंबईतील 16 जागांवर तीनही पक्षांचा दावा
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण आगामी काळात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपासाठी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जातोय. मविआ नेत्यांची आजदेखील याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या दोन महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे जागावाटपात आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या जागावाटपासाठी बैठकादेखील सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीची नुकतीच काही दिवासांपूर्वी मुंबईतील जागांच्या वाटपासाठी बैठक पार पडलेली. त्यानंतर आज पुन्हा बैठक पार पडली. या बैठकीत 16 जागांवर महाविकास आघाडीच्या पक्षांचं एकमत होताना दिसत नाही.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईतील बीकेसी येथे असणाऱ्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपावर चर्चा झाली. विशेष म्हणजे मुंबईतील जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आजची दुसरी बैठक होती. पण या बैठकीतही सर्व जागांवर तोडगा निघाला नाही, अशी माहिती मिळत आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. कारण ठाकरे गटाचा मुंबई हा बालेकिल्ला आहे. तर काँग्रेसदेखील जास्तीत जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटालाही काही जागा हव्या आहेत.
मविआच्या आजच्या बैठकीत काय घडलं?
महाविकास आघाडीच्या आज बैठकीतील इनसाईट स्टोरी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत आज अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली. पण मुंबईतील जागावाटप संदर्भात अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. कारण तीनही पक्षांचं जागावाटपाबाबत एकमत होताना दिसत नाहीय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात चर्चा सुरू आहेत.
ठाकरे गट २० ते २२ जागांसाठी आग्रही
काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे अजूनही पुढील बैठकीमध्ये मुंबईतील जागा वाटापाबाबत चर्चा होणार आहे. शिवसेना ठाकरे गट अजूनही २० ते २२ जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५ ते ७ जागांवर आपला दावा सांगितला आहे.