‘वंचित’साठी महाविकास आघाडी बॅकफूटवर, प्रकाश आंबेडकरांना आता नवी ऑफर
महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत सोबत घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात असल्याचं बघायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर मविआ वंचितसाठी एक पाऊल मागे आली आहे. मविआने प्रकाश आंबेडकर यांना आणखी एका जागेची ऑफर दिली आहे. ही ऑफर आता प्रकाश आंबेडकर मान्य करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्यातील मतदान जसजसं जवळ येत आहे तसतसं आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसतोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून बैठकांचं सत्र सुरु होतं. पण जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा काही जागांवर दावा होता. त्यामुळे चर्चेतून तिढा सोडवला जात होता. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत आधी प्रयत्न करण्यात आले. याबाबत बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर वंचितला मविआत सहभागी करुन घेण्यात आलं. पण जागावाटपाबाबत तिढा सुटत नव्हता. महाविकास आघाडीकडून वंचितला कालपर्यंत 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण वंचितमुळे लोकसभा निवडणुकीत संभाव्य धोका लक्षात ठेवता महाविकास आघाडीने बॅकफूटवर येण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वंचितला दिलेल्या नव्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीची वेट अँड वॉचची भू्मिका आहे. तर वंचितकडून मविआला 6 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात येणार होती. पण वंचितला नवा प्रस्ताव पाठवल्यानंतर ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार नाही. त्याऐवजी ठाकरे गट वंचितची भूमिका समोर आल्यानंतर उद्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीचा जवळपास तिढा सुटला?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत आता जागावाटपाचा तिढा संयमाने सोडवण्यात आला आहे. महाविकास आघाडीत भिवंडी, सांगली आणि जालना यांसारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटला आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार, जालन्याची जागा काँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटच लढवणार, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीत काय सुरु?
विरोधकांकडून जागावाटपासाठी जशी चर्चा सुरु आहे, अगदी तशाच चर्चा महायुतीतही सुरु आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास 99 टक्के सुटला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराचीदेखील आज घोषणा केली. रायगडमधून सुनील तटकरे लोकसभा निवडणूक लढवतील, असं त्यांनी जाहीर केलं. तसेच महायुतीच्या जागावाटपाबाबत येत्या 28 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊ, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.