मोठी बातमी! महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, 7 तास खल आणि मोठा निर्णय
महाविकास आघाडीच्या गोटात आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 25 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीची ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. ही बैठक सकाळी 11 वाजेपासून सुरु होती. जवळपास 7 तास ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत सहभागी व्हावं, असं निमंत्रण देणारं पत्र आज समोर आलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर व्हीसीद्वारे बैठकीत सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडला जाणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीला आणखी एक जागा मिळू शकते, अशी शक्यता आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना हातकणंगेची जागा मिळू शकते. राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याबाबत आजच्या बैठकीच चर्चा झाली. तसेच मुंबईतील चार जागा या ठाकरे गटाला देण्याबाबत चर्चा झाली. तर काँग्रेसला दोन जागा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीची आजची बैठक अतिशय सकारात्मक ठरल्याची माहिती समोर आली आहे.
जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्याबाबतची ही आजची महत्त्वाची बैठक होती. दुसरीकडे आजच्या बैठकीत सीपीआयकडून दोन जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यांना शिर्डी आणि परभणीची जागा हव्या आहेत. सीपीआयच्या नेत्यांनी आजच्या बैठकीत सहभागी होत भूमिका मांडली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जागावाटपाबाबत नंबर एकला ठाकरे गट असेल, दुसऱ्या नंबरला काँग्रेस आणि तिसऱ्या नंबरला राष्ट्रवादी असेल, अशी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची रचना समोर येताना दिसत आहे.
‘जागावाटप अत्यंत सुखरुप पार पडलं’, संजय राऊतांची प्रतिक्रिया
“महाविकास आघाडीच्या जागावाटपाची आजची बैठक पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे. आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहा, आम्ही हसतहसत बैठकीतून आलेलो आहोत. आम्ही सकाळी 11 वाजता बैठकीला बसलो, त्यानंतर आता साडेसहा वाजत आहेत. या काळात आमची सविस्तर चर्चा झाली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेकडून मी स्वत: आणि विनायक राऊत, त्यानंतर सीपीआयचेही प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व जागांवर व्यवस्थित चर्चा झाली. जागावाटप अत्यंत सुखरुप पार पडलं आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
“महाविकास आघाडी अत्यंत सुखरुप काम करत आहे. सगळं काही ठिक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित बोलणं सुरु आहे. आम्ही आज त्यांना औपचारिकपणे निमंत्रण पाठवलं आहे. त्यांची आज चर्चा झाली आहे. ते 30 तारखेच्या बैठीकाला सामील होत आहेत. त्यांना रितसर पत्र पाठवलं आहे. दिल्लीतल्या नेत्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. आम्ही आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करु. कारण देशाचं संविधान वाचायला पाहिजे, हीच भूमिका प्रकाश आंबेडकर यांची आहे”, असं राऊत म्हणाले.
“स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची व्यवस्थित चर्चा झाली. पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व निर्णय होतील. प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्यासोबत आहेत. ते कुठेही जाणार नाहीत”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.