Inside Story | ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते लोकसभेच्या ‘या’ 8 जागांवर अडून बसले

| Updated on: Jan 31, 2024 | 9:55 PM

महाराष्ट्रात पडद्यामागे सध्या प्रचंड राजकीय नाट्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीत सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. यासाठी दोन मॅरेथॉन बैठका देखील पार पडल्या आहेत. पण तरीदेखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही.

Inside Story | ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते लोकसभेच्या या  8 जागांवर अडून बसले
maha vikas aghadi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 31 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. सत्ताधारी पक्षांच्या गोटातही हालचाली घडत आहेत. पण विरोधकांच्या गोटात गेल्या अनेक दिवसांपासून घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. पण अजूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे महाविसास आघाडीच्यी मुंबईत दोन मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. तरीदेखील जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होत नाहीय. हा निर्णय न होण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. महाविकास आघाडीच्या दोन घटक पक्षाचं 8 जागांबाबत एकमत होत नाहीय. दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघांवर दावा सांगितला जातोय. त्यामुळे जागावाटपात मोठा तिढा निर्माण झालाय.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्यी तीनही पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर एकमत झालंय. पण तरीसुद्धा 8 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा कायम आहे. कारण या 8 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचाही दावा असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत आतापर्यंत 2 बैठका झाल्या आहेत. या बैठकीत लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर तोडगा निघालाय तर 8 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झालाय. कारण या 8 जागा अशा आहेत, तिथं काँग्रेस आणि ठाकरे गट दोघांचाही दावा आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसचा या 8 जागांवर दावा

रामटेक – शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाणे खासदार आहेत
हिंगोली – शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत पाटील खासदार आहेत
वर्धा – भाजपचे रामदास तडस खासदार आहेत
भिवंडी – भाजपचे कपिल पाटील खासदार आहेत
जालना – भाजपचे रावसाहेब दानवे खासदार आहेत
शिर्डी – शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत
मुंबई दक्षिण मध्य – शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शिवाळे खासदार आहेत
मुंबई उत्तर पश्चिम – शिंदेंच्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर खासदार आहेत

वंचित बहुजन आघाडीचा 12 जागांचा फॉर्म्युला

महाविकास आघाडी आता 3 पक्षांची राहिलेली नाही. मविआत वंचित आघाडीसह शेकाप, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी सह कम्युनिस्ट पार्टीचाही समावेश झालाय. नव्यानं समावेश केलेल्या पक्षांमध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी हा महत्वाचा पक्ष आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अर्थात AICCची मान्यता आल्यावरच वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल असं आंबेडकर म्हणतायत. त्याचवेळी 2 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला मात्र ते स्वत: जाणार आहेत आणि त्या बैठकीत वंचितच्या 12 जागांच्या फॉर्म्युल्यावर तुमचं काय ठरलं हे विचारणार असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. वंचित आघाडीनं 12 जागांची मागणी केलीय. त्यामुळे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट किती जागा सोडणार, यावर वंचितची पुढची भूमिका अवलंबून असणार आहे.