मविआत मोठे निर्णय होणार, प्रचंड खलबतं, दिग्गज नेते बैठकीला, आतली बातमी काय?
महाविकास आघाडीत सध्या जोरदार हालाचाली घडत आहेत. मुंबईच्या एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकत्र जमले आहेत. या बैठकीत जवळपास 39 जागांवर सर्वांचं एकमत झालं आहे. पण तरीही काही जागांचा तिढा कायम आहे. मविआच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी झाले. त्यामुळे या बैठकीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.
गिरीश गायकवाड, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीची हॉटेल फोर सिझन्समध्ये सलग तीन तासांपासून बैठक सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. असं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी हॉटेल फोर सिझन्समध्ये दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. ते सलग तीन तासांच्या बैठकीनंतर हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले. यावेळी त्यांनी माध्यमांना फार प्रतिक्रिया देणं टाळलं. आजच्या बैठकीत फार काही निर्णय झालेले नाहीत. पण पुढच्या बैठकीत नक्की निर्णय होतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील या दोघांना महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण आहे. फोर सिझन्स हॉटेलच्या सहा मजल्यावर एका कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक सुरु आहे. तिथे सर्व चर्चा सुरु आहेत. आतापर्यंत 39 जागांवर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. अमरावती, सोलापूर आणि अकोला या जागांवर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर एक निर्णय होणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याशिवाय मुंबईच्यादेखील एका जागेवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढू पाहतेय. त्यामुळे वंचितला जागा मिळणार का, वंचित मविआत एक घटक पक्ष म्हणून सोबत येणार का आणि प्रचाराची धुरा सांभाळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीचा 9 जागांवरील तिढा आज सुटण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जातोय.
माढ्याची जागा महादेव जानकर लढण्याची शक्यता
दरम्यान, माढ्याची लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात या विषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत निर्णय होणार आहे. यापूर्वीच महादेव जानकर यांनी अजून आपण कोणत्याही युती आणि आघाडीसोबत गेलो नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता माढ्याची लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.