अजित पवार यांच्या घरी खलबतं, मविआच्या महामोर्चाला अद्याप परवानगी नाही, मुंबईतल्या राजकीय घडामोड कुठपर्यंत जाणार?
महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. येत्या 17 डिसेंबरला महाविकास आघाडीकडून मुंबईत हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांकडून अजून परवानगी देण्यात आलेली नाही. पण महाविकास आघाडी मोर्चावर ठाम असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. परवानगी हा मोठा विषय नसून, परवानगी मिळेल आणि हल्लाबोल मोर्चा निघेल, असं अजित पवार यांनी म्हटलंय. बैठकीनंतर मविआ नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मागे आपण पत्रकार परिषद घेतली होतीच. परवा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राज्यातील आज सगळे प्रमुख पक्ष, आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या. मोर्चाच्या नियोजनाबद्दल चर्चा झाली”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“सगळ्या नागरिकांना आम्हाला आवाहन करायचं आहे, गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात जो कारभार चालला आहे, हा कारभार सरकार म्हणून चाललेला असताना महापुरुषांच्या बाबतीत, बेताल वक्तव्य, अपशब्द वापरण्याचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं काम हे काही थांबायला तयार नाही. त्यांना कुणी आवरही घालत नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी जसं पुण्यामध्ये झालं तसं आज वरळीत होतंय. लोकांध्ये अतिशय असंतोष आहे. त्यासाठी आम्ही 17 तारखेला मोर्चा काढत आहोत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“सीमाप्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरले गेले आहेत त्या गोष्टीचा धिक्कार करण्यासाठी, या लोकांना बाजूला करण्यासाठी अशा प्रकारचा हा मोर्चा काढला जाणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?
या मोर्चात मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरीक सहभागी होतील. महागाई हा देखील या मोर्चातील प्रमुख मुद्दा आहे. सर्व विरोधी पक्षांना अतिशय समजंस भूमिका घेतली आहे. सर्व विरोधी पक्ष या मोर्चासाठी एकत्र आले आहेत.
अतिशय शांततेच्या मार्गाने, मोर्चा विध्वंसक होणार नाही, शांततेने आम्ही मोर्चा काढणार आहोत. आम्ही या मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. अजून परवानगी मिळालेली नाही. पण आम्हाला परवानगी मिळेल, असा मला विश्वास आहे.
मुंबईच्या अधिवेशनात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी सभागृहाला उत्तर देत असताना आम्ही त्याबाबत पुढचं अधिवेशन होण्याच्या आत बैठक घेऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
ती बैठक आज उपमुख्यमंत्र्यांनी दुपारी एक वाजता लावलेली होती. मी उपमुख्यमंत्र्यांना विचारलं की, एक नागरीक म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात जी चर्चा झाली त्यामध्ये काय मार्ग निघाला असं विचारलं.
तर दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी, त्या संदर्भात दोन्ही राज्याच्या सहा मंत्र्यांची समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच अधिकाऱ्यांचीदेखील समिती उभी करणार आहेत. बोम्मई यांचं ट्विटर दुसरं कुणी वापरलं असेल तर त्यावर अॅक्शन करा असं सांगितलं. त्याच बैठकीत त्यांनी फोन लावला, अशी माहिती समजली.