मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 40 जागा मिळणार असल्याचं यापूर्वी भाकीत केलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचं भाकीत केलं आहे. तसेच भाजपला लोकसभा निवडणुकीत किती जागांचा फटका बसेल याचं भाकीत करतानाच भाजपला कोणत्या कोणत्या राज्यात सर्वाधिक फटका बसेल यावरही राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रातील सरकार जाणार की राहणार? अशी चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही भविष्यवाणी केली आहे.
भाजपने मिंधे गटाबरोबर एक केमिकल लोचा करून ठेवला आहे. या राज्याचं संपूर्ण जनमत या केमिकल लोच्याविरोधात आहे. आता निवडणुका घ्या. हिंमत असेल तर… जशी महापालिकेची टाळाटाळ करता तशी विधानसभा निवडणुकीची टाळाटाळ करू नका. महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या किमान 185 आणि लोकसभेच्या 40 जागा आम्ही जिंकणार आहोत. यासाठी कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. अंतर्गत नाही आणि बाहेरच्या अशा कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला. कोणत्या कोणत्या राज्यात भाजपला फटका बसेल याची माहितीही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगना, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान ही राज्य यावेळी भाजपच्या पाठिशी उभी राहणार नाहीत. भाजपला लोकसभेच्या किमान 100 ते 110 जागा कमी होतील. त्यासाठी सर्व्हेची गरज नाही, असा दावाही त्यांनी केला.
तावडे समितीचा अहवाल आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपचा सर्व्हे बाहेर कसा आला? त्यावर आपण कशाला विश्वास ठेवायचा? असा सवाल करतानाच आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. लोकभावना भाजपच्या विरोधात आहे. मिंधे गटाचा केमिकल लोचा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 निरपराध लोकांचा मृत्यू झाला. फडणवीस विरोधी पक्षात असते तर एव्हाना नवी मुंबईत जाऊन पोलिसांसमोर त्यांनी धुडगूस घातला असता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा. या 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारचीच आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आणि चेंगराचेंगरीमुळे 20 लोक दगावले. असंही त्यांनी सांगितलं.