महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा जन्म, ‘या’ नव्या समीकरणामुळे राजकारणाचे गणितं बदलणार?
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा घडामोडी वाढताना दिसत आहेत. मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात बैठकांचं संत्र सुरु असताना आता महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा जन्म झालाय.
मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई शहर हे देशाच्या राजकारणासाठी केंद्रस्थानी ठरताना दिसत आहे. कारण विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत आज आणि उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर सत्ताधारी महायुतीनेदेखील मुंबईत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी महायुतीची बैठक पार पडणार आहे.
एकीकडे महायुती आणि मविआत हालचाली सुरु असताना आता राज्यात तिसऱ्या आघाडीचा जन्म झाल्याची चर्चा आहे. या आघाडीला प्रागतिक पक्ष असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांचा एक गट असंही या म्हटलं जात आहे. ही आघाडी एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांपासून विभक्त आहे. विशेष म्हणजे या प्रागतिक पक्षांनी 2 सप्टेंबरला सोलापूरात जाहीर सभा बोलावली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रातील माकप, भाकप, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह 13 पक्षांची आघाडी स्थापन करण्यात आलीय. महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि दैनंदिन गरजेच्या प्रश्नांवर आंदोलन, जनजागरण सभा, जेल भरो आणि त्यानंतर मंत्रालयावर आक्रमक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांच्या वतीने हा धडक कार्यक्रम अखण्यात आलाय. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त हमीभाव, पीक नुकसानीची योग्य नुकसान भरपाई, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातल्या ‘या’ तिसऱ्या आघाडीत कोण-कोण सहभागी?
प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन, रिपाई (सेक्युलर) आणि श्रमिक मुक्ती दल हे 13 घटक पक्ष सहभागी आहेत.
या संदर्भातील प्रमुख मागण्यांसाठी राज्य पातळीवर सर्वप्रथम महाराष्ट्र जनजागरण सभा, जेल भरो आंदोलन आणि त्यानंतर मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉ. अशोक ढवळे, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. भालचंद्र कांगो, आमदार जयंत पाटील, आमदार अबू असीम आझमी, आमदार हितेंद्र ठाकूर तसेच आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.