महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांसह 48 खासदारांनी राजीनामा द्यावा; उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
uddhav thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लबोल केला. राज्यातील परिस्थिती गंभीर झाली असताना देवेंद्र फडणवीस दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी फिरत होते, त्यामुळे त्यांना राज्याची किती काळजी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई | 31 ऑक्टोंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रश्न सोडून दुसऱ्या राज्यात भाजपच्या प्रचारास गेले होते. रायपूरमध्ये ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना राज्य आणि राज्यातील प्रश्न किती महत्वाचे आहे? हे दिसून येत असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आरक्षणासाठी दिल्लीत दबाब गट तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ पडल्यास महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आरक्षणाचा विषय दिल्लीत सुटणार
राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी. राज्यात जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, त्या तोडण्यासाठी फक्त संसदेत कायदा करुनच निर्णय घेता येईल. तो घेणार नसाल तर आम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा देतो, असे राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले पाहिजे. त्यानंतर निर्णय झाला नाही तर राज्यातील ४८ खासदारांनी राजीनामे देऊन महाराष्ट्रातील एकता दाखवून दिली पाहिजे.
मणिपूर जळतंय महाराष्ट्र पेटत आहे, नरेंद्र मोदी भाषण करून जातात. त्यांना काहीच फरक पडत नाही. यामुळे आता दिल्लीच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील सर्व मंत्र्यांनी गोयल, गडकरी, दानवे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला पाहिजे. अन्यथा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
रामशास्त्री बाणा जपा
राज्याला न्यायदानाची परंपरा आहे. रामशास्त्री बाणा आपण त्यालाच म्हणतो. सत्ताधीश कितीही बलवान असला तरी त्याच्यासमोर न झुकता न्याय देण्याची परंपरा महाराष्ट्राने दिली आहे. त्याच परंपरेला जागून केवळ शिवसेनेलाच नाही तर लोकशाहीला न्याय मिळेल अशी खात्री आहे. यामुळे ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ, असा मला विश्वास आहे.