काँग्रेसच्या बैठकीतली Inside Story, मुंबईत बड्या नेत्यांमध्ये खल, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत?
काँग्रेसची मुंबईत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांवर दावा करणार असल्याचं बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मविआत काही मोठं घडणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समसमान जागावाटपाच्या तयारीत असताना काँग्रेस सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढाव्यात आणि सर्वाधिक जागांवर जिंकून यावं, असा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यात महाविकास आघाडीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जात आहे. असं असलं तरीही काँग्रेसमध्ये काही समस्या देखील आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग झालेलं बघायला मिळालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बरोबर हेरलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांनी या आमदारांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर आता कारवाई अटळ आहे. या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक दादर येथील टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
काँग्रेसच्या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली?
- काँग्रेसच्या आजच्या बैठकीत राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना आणल्या आहेत त्याला कसं प्रतिउत्तर देण्यात येणार यासंदर्भात चर्चा झाली. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षासाठी जी थिंक टँक काम करत आहे, त्यांच्याकडून या शासकीय योजनांना कसं प्रत्युत्तर देण्यात येणार यासंदर्भातील मार्गदर्शन घेण्यात आलं.
- काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना काढण्यात आल्या आहेत त्यासंदर्भातील धसका घेण्यात आला आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारकडून एक लाडली बहीण योजना सुरु करण्यात आली होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभेत सपाटून मार खावा लागला होता.
- या बैठकीत आगामी काळात काँग्रेस पक्षाची निवडणुकीत काय रणनिती असेल यासंदर्भात चर्चा झाली आहे.
- काँग्रेसकडून सर्वाधिक विधानसभेच्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये दावा करण्यात येणार, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
- विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात येणार आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवरील कारवाईच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. पण केसी वेणुगोपाल यांनी हा निर्णय दिल्लीतून आम्ही घेऊ, असा निर्णय या बैठकीत घेतला.