‘त्यांनी आरशात आपला चेहरा पाहावा’, देवेंद्र फडणवीस इतके का संतापले?
विरोधकांनी आज सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत विविध मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या पत्राला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथेनुसार, विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. पण विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याउलट त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. संबंधित पत्रात मांडलेल्या मुद्द्यांवर आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी पत्रात मांडलेल्या मुद्द्यांवरुन उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात घमासान होण्याची शक्यता आहे. त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला.
“अधिवेशनाला सरकार सामोरं जात आहे. विरोधी पक्षाने आज प्रथेपणाने चहापानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिलेलं आहे, खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह निर्माण करुन एखाद्या निवडणुकीत थोडसं यश मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेत विरोधी पक्ष गेलाय, असं मला वाटतं. त्यांनी दिलेल्या पत्राचा एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहायला पाहिजे, अशा प्रकारचं हे पत्र आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘विरोधकांनी स्वत:ला प्रश्न विचारले पाहिजेत’
“विदर्भातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात अपयश, असं ते म्हणाले. अडीच वर्षे ज्यांचं सरकरा होतं त्यांनी विदर्भाच्या प्रकल्पासाठी काहीच काम केलं नाही. पण आमच्या सरकारने अनेक कामं केली. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाचा जीआर आम्ही आणला. मध्यंतरी जुन्या सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीसारखीदेखील पुढे सरकली नाही. विरोधकांनी स्वत:ला प्रश्न विचारले पाहिजेत की, त्यांच्या काळात विदर्भातील प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“मराठा वॉटरग्रेडचं काम आम्ही केलं. पण महाविकास आघाडी सरकारने वॉटरग्रेड बंद करण्याचं काम केलं. आम्ही तर याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे केला आहे. पेपरफुटीच्या संदर्भात ते बोलत आहेत. सर्वात जास्त पेपरफुटी ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली. सगळ्यांनी पाहिलं आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या त्याचा रिपोर्टकार्ड आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. त्यांच्या काळात तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर गेलेला महाराष्ट्र हा दोन्ही वर्षी एक नंबरला आला”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
“वित्तीय केंद्र 2012 मध्ये गुजरातला गेलं. पण त्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि देशात काँग्रेसचा पंतप्रधान होता. खोटे नरेटिव्ह तयार करण्याची एक फॅक्ट्री ही जी विरोधकांनी उघडली आहे या फॅक्ट्रीचा पर्दाफाश आम्ही अधिवेशनात निश्चित करु. विशेषत: गँगस्टर उभे राहिले आहेत आणि ड्रग्जच्या संदर्भात मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते हे विसरतात की, शंभर कोटी रुपयांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने यांच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करुन अटक केली. उच्च न्यायालयाच्या तेव्हाच्या मुख्य न्यायाधिशांनी यांच्या गृहमंत्र्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. आज ड्रग्जच्या विरुद्ध आम्ही लढाई सुरु केली आहे. आम्ही संपूर्ण देशात ही लढाई सुरु केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे साठे सापडत आहेत. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. पुण्यातील पोर्शे कार दुर्घटना ही दुर्दैवी होती. पण त्यावेळीदेखील राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका घेतली आहे”, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा ठाकरेंना इशारा
“बॉडीबॅगचा घोटाळा कुणी केला? प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणे कशाला म्हणतात? कोविडचे घोटाळे, खिचडेची घोटाळे हे सरकार विसरलेलं नाही. हे विरोधी पक्ष विसरलेला दिसत आहे. आम्ही सर्व काढणार. सगळी उत्तरे देणार. आमची चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षाने केवळ हंगामा करायचा आणि मीडियात जावून बोलायचं, त्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं आम्ही त्यांना देऊ. आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, त्यांनी काय केलं याची उत्तरं देऊ. मला विश्वास आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री हे अर्थसंकल्प मांडतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“विरोधकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. आम्ही शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची नुकसान भरपाई दिली. आमचं सरकार काम करणारं सरकार आहे. जलयुक्त शिवार योजना विरोधकांनी बंद केली होती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा योजना सुरु केल्या. मविआच्या काळात रखडेलेल्या अनेक योजना आम्ही सुरु केल्या. राज्यातून उद्योग गेलेत असा खोटा आरोप विरोधक करतात. महाराष्ट्रात नवे उद्योग आणण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आम्ही कोस्टल रोड सुरु केला. त्याचंही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईला विरोधकांनी खड्ड्यात टाकलं होतं”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.