पत्राचा नेमका घोळ काय? अनिल परब म्हणतात, आमच्याकडे पोचपावती, पण नार्वेकरांचा वेगळाच दावा
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर भूमिका मांडताना अनिल परब यांनी निवडणूक आयोगाच्या पोचपावतीचं पत्र माध्यमांसमोर दाखवलं आहे. पण त्या पोचपावतीच्या पत्रावर राहुल नार्वेकर यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई | 16 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आधी वकील असीम सरोदे यांनी भूमिका मांडली. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. यावेळी अनिल परब यांनी शिवसेनेच्या 2014च्या प्रतिनिधी सभेचा व्हिडीओच दाखवला. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पोचपावतीचा फोटो दाखवला. विशेष म्हणजे अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतही त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांचा पुरावा दाखवला होता. त्यानंतर त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतही तसे पुरावे दाखवले. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनिल परब दाखवत असलेल्या पोचपावती आणि पत्राचा मुद्दाच खोडून काढला. अनिल परब फक्त ती पोचपावती दाखवत आहेत. पण त्यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते वाचून दाखवत नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
“ते खोटं बोलत आहेत. त्यांनी २०१३च्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला. मी उपस्थित होतो ते दाखवलं. तुम्ही पत्राचा जो उल्लेख करत आहात, त्यात काहीच म्हटलेलं नाही. त्या पत्रात पक्ष घटनेचा उल्लेखच नाही”, असा दावा राहुल नार्वेकर यांनी केला. “पत्रासोबत निवडणूक निकाल जाहीर केल्याचं पत्र दिलं आहे. घटनेत दुरुस्ती झाली आहे. त्याची कॉपी देत आहोत असा कुठेही उल्लेख नाही. केवळ निकालच त्यांना आयोगाला सादर केला. त्यांच्याकडे घटनादुरुस्तीची पोचपावती नाही. संघटनात्मक निवडणूक झाली, त्याचा निकाल लागल्याची पोचपावती त्यांच्याकडे आहे”, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
“जो युक्तिवाद आज त्यांनी मीडियासमोर केला. तो माझ्यासमोर केला का? २०१३च्या संविधानाबाबत युक्तिवादच केला नाही. अनिल परब हे ४ एप्रिल २०१८चं पत्र दाखवत असतात. एकदाही वाचून दाखवत नाही. निवडणुकीचा निकाल त्यांनी आयोगाला कळवला आहे. त्यात त्यांनी संविधान दुरुस्तीचा उल्लेख केला नाही. वस्तुस्थिती मांडत नाहीत. कोणतंही पत्र दाखवतात. काहीही सांगतात. वाचून दाखवत नाही. कारण बंद मुठी लाख की खुलगई तो खाक की”, अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केली.
आता सुप्रीम कोर्टात फैसला होणार
शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. शिंदे गट विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात गेला आहे. ठाकरे गटाचे आमदार अपात्र व्हावेत, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. पण त्याआधी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर टीका केली जात आहे. तर विधानसभा अध्यक्षांकडून त्यांच्या टीकेला उत्तर दिलं जात आहे.