Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची EXCLUSIVE मुलाखत, अपात्रतेचा निकाल कधी?
महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर अध्यक्षांनी सुनावणी सुरु केलीय. त्याच संदर्भात TV9नं विधानसभेच्या अध्यक्षांकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आवश्यक तेवढा वेळ घेणारच, असं नार्वेकर म्हणाले आहेत.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी TV9शी बोलताना एक बाब स्पष्ट केली की, अपात्रतेच्या निकालासाठी आवश्यक तेवढा वेळ घेणार. म्हणजेच, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सुनावणीला अधिक वेग येऊन निकालही लवकर येऊ शकतो, अशी जी चर्चा होती. त्यावर स्वत: विधानसभा अध्यक्षांनीच उत्तर दिलंय. सुनावणी आणि निकालासाठी जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घेणारच. त्यासाठी कोणतीही संस्था रोखणार नाही, असं स्पष्टपणे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेच्या अध्यक्षांना फैसला घ्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी सत्तासंघर्षाचा निकाल देताना प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवलं. मात्र, वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. त्यासाठीच ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंनी सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेतली. त्यानंतर आता एका आठवड्यात सुनावणी घ्या, असे आदेश कोर्टानं नार्वेकरांना दिले आहेत. मात्र निर्णय घेताना घाई होणार नाही, कायद्यानुसारच सारंकाही होणार, असं नार्वेकर म्हणाले आहेत.
निकालाआधी नार्वेकरांना काय करावं लागणार?
शिवसेना हा मुख्य राजकीय पक्ष कोणाचा, उद्धव ठाकरेंचा गट की शिंदे गट? हे आधी राहुल नार्वेकरांना ठरवावं लागेल. त्यानंतर गट नेते आणि प्रतोद अर्थात व्हीप कोणाचा लागू होईल? हे विधानसभेच्या अध्यक्षांना ठरवायचं आहे. ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंचा व्हीप लागू होईल की शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप मान्य असेल? यावरच अपात्रतेचा निकाल अवलंबून असेल. त्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडून पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडलीय. जेमतेम सुरु झालेली सुनावणी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, त्यावर निकाल अपेक्षित आहे
दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या अध्यक्षांद्वारे होणाऱ्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी केलीय. सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टानं लाईव्ह केली होती. त्याचप्रमाणं अध्यक्षांकडून होणारी सुनावणीही लाईव्ह व्हावी, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.
आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे फक्त शिंदे किंवा ठाकरे गटाच्याच नजरा आहेत असं नाही. तर महाराष्ट्राच्या जनतेच्या नजराही अपात्रतेच्या निकालाकडे लागल्या आहेत. मात्र सुनावणी कधी संपणार? पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी कधी पूर्ण होणार? त्यावरच निकाल अवलंबून आहे. अर्थात त्या निकालानंतरही सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेता येईल.