ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेला तर…? विधानसभा अध्यक्षांचं निकालापूर्वी सर्वात मोठं वक्तव्य
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर राज्यात फार काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार नाहीत. महाराष्ट्र सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. पण निकाल विरोधात लागल्यानंतर ठाकरे गट त्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जावू शकतं. याबाबत राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मुंबई | 9 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर करणार आहेत. पण आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होण्याआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांच्या एका कृतीवर आक्षेप नोंदवला. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घडून आली. या भेटीवर ठाकरेंनी आक्षेप घेत टीका केलीय. त्यावर राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केलाय. तसेच निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव निर्माण करण्यासाठी किंवा दबाव टाकण्यासाठी असे वक्तव्य केले जातात, असं म्हणत नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. याशिवाय आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय. तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा संविधानानुसार आणि नियमांना धरुनच असेल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं. यावेळी राहुल नार्वेकर यांना पत्रकारांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाने त्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं तर? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राहुल नार्वेकरांनी रोखठोक भूमिका मांडली.
“प्रत्येकाला कोर्टात जायचा अधिकार आहे. पण कोर्टात जाऊन माझ्यावर काहीही दबाव पडणार नाही. मी जे कार्य करत आहे ते कायदेशीररित्या अत्यंत योग्य आहे. कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाही. माझा निर्णय निश्चितपणे कायद्याच्या स्वरुपात असेल”, असं राहुल नार्वेकर म्हणाले. यावेळी नार्वेकरांना उद्या निकाल किती वाजता जाहीर करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट अशी वेळ सांगितली नाही. “निकाल हा दिलेल्या वेळमर्यादेतच घेऊ. निकाल उद्या किती वाजता जाहीर करायचा याबाबत कार्यालयात जावून निर्णय घेईन”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.
‘मी देशाच्या जनेतेला आश्वासित करु इच्छितो’
“जो निर्णय घेत असतो, त्या व्यक्तीच्या निर्णय प्रकियेवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा दबाव टाकण्यालाठी असे आरोप केले जातात. पण आपल्या माध्यमातून मी देशाच्या जनेतेला आश्वासित करु इच्छितो, मी जो निर्णय देणार आहे तो संविधानाच्या तरतुदींच्या आधारावर आणि विधीमंडळाच्या प्रथा-परंपरेचा विचार करुन योग्य निर्णय घेईन”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
उद्याच्या निकालानंतर काय घडामोडी घडणार?
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ठाकरे गटासाठी हा मोठा झटका असेल. तसं घडलं तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील. पण तरीही उद्धव ठाकरे यांच्यासाठी कायद्याचे दरवाजे उघडेच राहतील. उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.