राष्ट्रवादीचा निकाल शिवसेनेसारखाच लागणार?; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजितदादा गटाला दिलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्ष हातातून गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आता नवी रणनीती आखण्यात येत आहे. वकिलांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. काय मार्ग काढायचा? सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करायचा यावर शरद पवार गटात मंथन सुरू आहे.
नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निक्काल अखेर लागला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा यांच्या गटाकडे दिला आहे. अजितदादा पवार यांच्याकडे बहुमत आहे. आमदार आणि खासदारांची सर्वाधिक संख्या अजितदादा गटाकडे आहे. त्यामुळे आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचा ताबा अजितदादा गटाकडे दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला आता विधानसभा अध्यक्षांकडे होणार आहे. त्यामुळे शिवसेनेसारखाच अजित पवार गटाचा निकाल लागणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच सवाल केला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
अजब न्याय
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित होता, जे उद्धव ठाकरे यांच्या बाबत झाले तोच निकाल लागला. निवडणूक विभागाचा हा अजब न्याय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या न्यायालयात विषय मार्गी लागेल, लोकच ठरवतील, असे चव्हाण म्हणाले. पक्षाचे निवडणूक चिन्ह बदलले तरी काही फरक पडत नाही. जनता हुशार झाली आहे. निष्ठेमध्ये काही फरक पडत नाही, असंही ते म्हणाले.
मेरिटवर निर्णय
राष्ट्रवादीचे जवळपास 42 आमदार अजित पवार साहेब यांच्या बाजूने आहेत. तर 11 की 12 आमदार शरद पवार साहेबांच्या बाजूने असल्यामुळे आणि बऱ्यापैकी खासदार आणि नगरसेवक हे सगळे अजित दादाच्या बाजूने असल्यामुळे तो निकाल अपेक्षित होता. शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह जसं मेरिटवर मिळालं, तसंच अजितदादा यांना मिळालं आहे. त्यामुळेच हा निर्णय अपेक्षित होता, असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
चाळीसगावात जल्लोष
दरम्यान, निवडणूक चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर अजितदादा गटाने मोठा जल्लोष केला आहे. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजित दादागटाला मिळाल्याने जळगावच्या चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांचे आतिषबाजी करत डीजेच्या तालावर ठेका धरला.