राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देणारे मोठे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले, याबाबतची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची संक्षिप्त माहिती समोर आली आहे.
मोहन देशमुख, Tv9 मराठी, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत काय-काय निर्णय घेण्यात आले याबाबतची संक्षिप्त माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्री गैरहजर होते. दिवाळीच्या निमित्ताने मंत्री आज बैठकीत उपस्थित नव्हते. पण तरीही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागातून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासासाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला. आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आलं. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ओबीसी नेत्यांची जालन्यात मोठी सभा पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाबाबत काही चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी घेतली बैठक
कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रीकॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 चा अहवाल कॅबिनेटसमोर सादर केला . त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ उपस्थित नव्हते.