मंत्रिमंडळातून भाजपच्या या मंत्र्यांचा होणार पत्ता कट? या नवीन आमदारांना मिळणार संधी?
Maharashtra Cabinet : भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतो. आज दिल्लीत महत्त्वाची बैठत होत आहे. तिन्ही नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. मंत्रिमंडळावर या बैठकीत चर्चा होईल.
राज्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या ४ दिवसांपासून सस्पेंस होता. अखेर काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं देखील बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे आता जवळपास निश्चित झालं असून आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. त्यामुळे अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतील. पण शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेतील की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही.
मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातेही कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असतील. कारण भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काही नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या जागी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित यांच्याबाबतीत भाजपची सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे.
भाजपकडून कोणाला संधी मिळू शकते?
आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी आशिष शेलार यांनी मंत्रिपद देऊन भाजप मुंबईत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करु शकते.
रवींद्र चव्हाण सलग चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आल्याने तसेच ठाणे आणि कोकणातील विधानसभा निवडणुकीत 100 टक्के स्ट्राइक रेट राखल्यामुळे त्यांनी मोठं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा, ओबीसी चेहरा, महिला नेतृत्व, मराठवाड्यातील यश यामुळे पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
नितेश राणे यांना देखील भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा, कोकणातील प्रमुख नेते म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.
गोपीचंद पडळकर यांना देखील भाजपचा चेहरा, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती आणि आक्रमक नेतृत्व यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.