आतली बातमी! ‘दर आठवड्यात किमान तीन दिवस मुंबईत मंत्रालयात थांबा’, मुख्यमंत्र्यांचा सर्व मंत्र्यांना आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि राज्य मंत्र्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रत्येक आठवड्यात किमान तीन दिवस मुंबईत मंत्रालयात थांबा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्याच्या मंत्र्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता एक महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर कुणाचं सरकार येईल? याबाबत मोठी उत्सुकता होती. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन झालं. पण यावेळी भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आलेल्या असल्यामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात राज्य मंत्रिमंडळाचा देखील विस्तार झाला आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळासाठी आता खातेवाटपही झालं आहे. अनेक मंत्र्यांकडून आपापल्या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्यात आला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सर्व मंत्री आज मुंबईत मंत्रालयात आले होते. प्रत्येक मंत्री हे त्यांच्या खात्याचे मंत्री असले तरी ते त्यांच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी देखील आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाचीदेखील कामे करणं अनिवार्य आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून आपल्या मतदारसंघांचा विकासासह राज्यातील विकासकामांकडेही लक्ष द्यावं लागतं. मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे मंत्र्यांनी जास्त काम करणं हे साहजिकच अपेक्षित असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे याच भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय सूचना केल्या?
आता दर आठवड्यात किमान तीन दिवस मुंबईत थांबा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. लोकांच्या कामासाठी आठवड्यात किमान तीन दिवस मंत्रालयात भेटा. उरलेल्या दिवसांत मतदारसंघातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या गतिमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांना हे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेमागेदेखील महत्त्वाचं कारण आहे. मंत्रालयात दररोज शेकडो नागरीक हे त्यांच्या विविध कामांसाठी भेटी देत असतात. शेकडो नागरीक रांगेत तासंतास थांबून मंत्रालयात जाण्यासाठी पास मिळवतात. त्यानंतर नागरीक त्यांना आवश्यक असणाऱ्या विभागात जातात. तिथे जावून तिथले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. यानंतर काही वेळेला त्या विभागाच्या मंत्र्यांची स्वाक्षरी किंवा मदतीची गरज नागरिकांना भासते. अशा परिस्थितीत तिथे मंत्री उपस्थित राहणे जास्त आवश्यक असतं. त्यामुळे त्या त्या खात्याचे मंत्री तिथे उपस्थित राहिले तर नागरिकांना देखील सोयीस्कर होईल. तसेच अधिकारी आणि कर्मचारी कामात दिरंगाई करत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांना हटकवून लावत असतील तर मंत्री तिथे उपस्थित राहिल्याने त्यांचा प्रशासनावर चांगला दबाव राहील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिलेले आदेश महत्त्वाचे आहेत.