BREAKING : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
सीमा भागातील मराठी बांधवांना कोणाताही त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आलीय.
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप महत्त्वाची माहिती दिलीय. संबंधित वाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सीमा भागातील मराठी बांधवांना कोणाताही त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आलीय. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबतही याबाबत चर्चा करण्यात आलीय, अशी महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना दिलीय.
“माझी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचित झालीय. मी त्यांना सांगितलंय की, महाराष्ट्राचे जे नागरीक तिकडे जात आहेत त्यांना कोणताही त्रास दिला होऊ नये. ज्यांनी गैरप्रकार केलाय, तोडफोड केलीय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यावर त्यांनी मान्यता दिलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही माझी बातचित झालीय”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत तरी दोन्ही राज्यातील कायदा व्यवस्था सुरळीत राहायला पाहीजे. दोन्ही राज्याच्या नागरिकांना त्रास होऊ नये, अशीदेखील चर्चा झाली. या मुद्द्यावर योग्य तोडका निघेल”, अशी आशा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
“महाराष्ट्राच्या बसची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीय”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. तसेच “इथून पुढे अशाप्रकारच्या घटना घडणार नाही हे त्यांनीही मान्य केलंय”, असंदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचित केलीय. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केलीय. सीमावादाच्या मुद्द्यावरुन सीमाभागात तणाव वाढत चाललाय. अशाप्रसंगी अमित शाह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करुन मध्यस्थी करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.