Maharashtra Corona | घाबरु नका, पण ‘हा’ आकडा चिंता वाढवणारा, दिवसभरात तब्बल 9 मृत्यू आणि रुग्णसंख्येचा विस्फोट
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसरी लाट आली तेव्हा सर्वात आधी राजधानी मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. यावेळीदेखील मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची आरोग्य परिस्थिती आलबेल आहे, असं वरवर पाहता दिसत आहे. राज्यातील सर्व बाजारपेठा उघड्या आहेत. शॉपिंग मॉल, थिएटर, कारखाने, कंपन्या, दुकानं नित्य नियमाने सुरु आहेत. तीन वर्षांपूर्वी कोरोना संकट आल्यानंतर लॉकडाऊनमुळे या सगळ्यांना ब्रेक लागलेला. पण कोरोना संकट ओसरल्यानंतर पुन्हा सारं काही पूर्ववत झालं. त्यानंतर राज्यातील नागरीक हे आता मोकळेपणाने सर्वत्र फिरताना दिसत आहेत. पण मोकळेपणाने फिरत असताना एका गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजी. ती गोष्ट म्हणजे कोरोना अद्यापही संपलेला नाही. याउलट ते संकट पुन्हा डोकंवर काढतंय की काय? अशी भीती निर्माण झालीय. पण तरीही सध्याची परिस्थिती ही घाबरण्याची नाही तर काळजी घेण्याची आणि या संभाव्य धोक्याला गाळण्यासाठी सज्ज राहण्याची आहे.
महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाची जी नवी आकडेवारी समोर आलीय ती चिंता वाढवणारी आहे. कारण राज्यात आज दिवसभरात तब्बल 1 हजार 115 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे दिवसभरात तब्बल 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे वृत्त शंभर टक्के खरं आहे. कोरोनाबाधितांच्या या नव्या आकडेवारीकडे पाहता आता आपण काळजी घेणं जास्त आवश्यक असल्याचे संकेत मिळत आहेत.
दिवसभरात 560 रुग्णांची कोरोनावर मात
एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधानकारक आहे. राज्यात आज दिवसभरात 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील आतापर्यंत 79 लाख 98 हजार 400 कोरोनाबाधित रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्के इतके आहे. तर मृत्यूदर हा 1.82 टक्के एवढा आहे.
जगभरात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून 2 टक्के प्रवाशांचे नमून कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे.
मुंबईत दिवसभरात 242 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसरी लाट आली तेव्हा सर्वात आधी राजधानी मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. यावेळीदेखील मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. मुंबईत आज दिवसभरात 242 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 214 जणांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर 28 रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे मुंबईत आज दिवसभरात 218 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.