मविआला डिवचण्यासाठी परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेतलं का? फडणवीस म्हणतात….
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी निलंबन नेमकं का मागे घेतलं या विषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीला धक्का देणारा मानला जातोय. कारण परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. तसेच तब्बल वर्षभर पेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं होतं. परमबीर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्त असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी घोटाळ्यांचे आरोप केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर अनेक घडामोडी घडल्या होत्या. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. नंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हिरे व्यापारी मनसुख हिरे यांच्या हत्येची घटना समोर आली. या घटनेतून एपीआय सचिन वाझेला बेड्या ठोकण्यात आल्या. या सगळ्या घडामोडींदरम्यान परमबीर सिंह यांना 2021 मध्ये निलंबित करण्यात आलं. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख अटकेत असताना परमबीर सिंह यांच्यासोबतच्या भेटीची देखील बातमी समोर आलेली. त्यानंतर आता सिंह यांना सध्याच्या सरकारने दिलासा दिल्याची माहिती मिळत आहे.
निलंबन मागे का घेतलं? देवेंद्र फडणवीस म्हणतात….
या सगळ्या घडामोडींनंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंह यांचा राजीनामा का मागे घेतला? या विषयी माहिती दिली आहे. “कॅटचा एक निर्णय आला, कॅटच्या निर्णयामध्ये कॅटने अतिशय स्पष्टपणे त्यांची डी बेकायदेशीर ठरवून, त्यांच्यावरचं निलंबन हे कॅटनेच रद्द केलेलं आहे. त्यामुळे सरकारने कॅटच्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी केली आहे. त्या अंमलबजावणी अंतर्गत डी बेकायदेशीर ठरवल्याने डी बंद झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांचं निलंबन देखील मागे झालेलं आहे”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“सेंट्रल अॅडनिस्ट्रेटिव्ह ट्रॅबिन्यू (कॅट) यांनी दिलेल्या निर्णयामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधातील डिपार्टमेंटल कारवाईला चुकीचं ठरवत ही कारवाई बंद करण्यात आली. कॅटने परमबीर सिंह यांचं निलंबनही चुकीचं ठरवत निलंबन मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, 2021 मध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. पण आता निलंबन मागे घेतलंय. आता निलंबनाच्या काळात ते सेवेत होते, असं समजलं जाईल. परमबीर सिंह निवृत्त झालेत, त्यामुळे ते पुन्हा सेवेत येणार नाहीत. परमबीर सिंह आयुक्त पदावर असतानाच मन्सुख हिरेन प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप झाले होते. मन्सुख हिरेन प्रकरणातच सचिन वाझे तुरुंगात आहे.