महाराष्ट्राचा राजकारणात खरंच भूकंप येणार? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
भाजपने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे विरोधकांनी देखील भाजपवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलंय. अर्थात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्यानंतर भाजपने संबंधिक व्हिडीओ डिलीट केलाय. पण या व्हिडीओवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान सुरु झालंय.
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : भाजपच्या अधिकृत ट्विटरवर अकाउंटवर काल एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. त्या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईल, असं म्हणताना दिसत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडेल का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. याबाबत जास्त चर्चा होऊ लागल्याने अवघ्या 55 मिनिटांत भाजपला तो व्हिडीओ हटवावा लागला. या सर्व प्रकारावर आता देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.
भाजपच्या व्हिडीओमुळे संभ्रम निर्माण झालाय. त्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “मला तर कधीकधी आश्चर्य वाटतं. माझा पहिला प्रश्न असा आहे की, कुणाला यायचं असेल तर तो व्हिडीओ टाकून येईल का? किती वेडेपणा आहे? काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘वेगळा अर्थ लावणं चुकीचं’
“मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. एकनाथ शिंदे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी राहणार नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी खंबीर आहोत. एखादा व्हिडीओ असा पडला, तसा पडला, त्याचा विनाकारण वेगळा अर्थ लावणं चुकीचं आहे”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 110 आमदार आहेत. मी त्यांना नजरअंदाज करणार नाही. पण माझ्याकडे 110 आमदार असते तर मी नवं सरकार बनवलं असतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
“देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकनाथ शिंदे यांच्याच पाठिशी राहणार, एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकस घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“ज्यांच्या नेतृत्वाताखाली 305 खासदार निवडून येताना, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. पण ठिक आहे, शरद पवार नेमकं काय म्हणाले? मी काही त्यांची पत्रकार परिषद पाहिली नाही. त्यामुळे मी त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.