मोठी बातमी! 22 दिवसांच्या उपचारानंतर मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालय प्रशासनाकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. पी. डी. हिंदुजा रुग्णालय प्रशासनाने याबाबत मीडिया स्टेटमेंट जारी करत जोशी यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पी. डी. हिंदुजा रुग्णालयाकडून मीडिया स्टेटमेंट जारी करुन मनोहर जोशी यांच्या प्रकृती विषयी माहिती देण्यात आली आहे. मनोहर जोशी यांच्यावर गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी रुग्णालय प्रशासनाची एक टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात होती. तसेच ते बरे व्हावेत यासाठी उपचार सुरु होते. मनोहर जोशी बरे व्हावेत यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. जोशी यांच्या प्रकृतीत आता सुधारण झाली आहे. तसेच त्यांना आज रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.
मनोहर जोशी यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना 22 मे रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकांनी मनोहर जोशी यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हिंदुजा रुग्णालयात जावून मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास
हिंदुजा रुग्णालयाकडून गेल्या आठवड्यात 5 जून रोजी मीडिया स्टेटमेंट जारी करण्यात आलं होतं. त्यावेळी जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच मनोहर जोशी यांना आयसीयूतून बाहेर शिफ्ट केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. जोशी यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या, असंही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.
मनोहर जोशी यांची प्रकृती आता सुधारली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे नेते मानले जायचे. जोशी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संविधानिक पदे भूषविली आहेत. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं.