शेतकऱ्याला 2 रुपयाचा चेक दिला, शिंदे-फडणवीस सरकारची कडक कारवाई, सूर्या ट्रेडर्सचा थेट परवाना रद्द
एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने 512 किलो कांदे विक्रीला नेला तेव्हा त्याला अवघ्या दोन रुपयांचं चेक मिळाल्याची बातमी समोर आलेली. संबंधित शेतकऱ्याचं राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) असं नाव आहे.
मुंबई : एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने 512 किलो कांदे विक्रीला नेला तेव्हा त्याला अवघ्या दोन रुपयांचं चेक मिळाल्याची बातमी समोर आलेली. संबंधित शेतकऱ्याचं राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) असं नाव आहे. या शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला. अखेर या प्रकरणाची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घ्यावी लागली. विशेष म्हणजे शेतकऱ्याला 2 रुपयांचा चेक देणाऱ्या सूर्या ट्रेडर्सचा परवानाच थेट राज्य शासनाने रद्द केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.
“शेतकरी राजेंद्र चव्हाण यांचं जे प्रकरण आहे, त्यांनी 512 किलो कांदा विक्रीला आणला होता. छोटा कांदा कमी प्रतीचा असतो. त्याला शंभर-दीडशे रुपये भाव आहे. तर चांगल्या कांद्याला पाचशेचा भाव आहे. राजेंद्र यांना 512 रुपये मिळाले. पण त्यांना जो चेक मिळाला त्या सिस्टममधून त्यांना फक्त दोनच रुपये मिळाले. कारण त्यामधून वाहतुकीचा खर्च कापण्यात आला. असा जो कमी प्रतीचा कांदा असतो त्यातून वाहतुकीचा खर्च कापता येत नाही. याबाबत 2014 साली नियम करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आलाय”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाविषयी माहिती दिली.
“उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतोय. या अधिवेशनासाठी चार आठवड्यांचा कालावधी ठेवला आहे. तीन वर्षांनी चार आठवड्यांचं अधिवेशन होतंय. सामान्य माणसाच्या हिताकरता निर्णय व्हावे, सर्वप्रकारच्या चर्चेसाठी राज्य सरकारची तयारी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणखी काय-काय म्हणाले?
लोकहिताचे निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतले जातील. तीन बिलं प्रलबित आहेत. आणि सहा प्रस्ताव आहे. लोकायुक्ताचं बिल मंजूर करण्याचा आमचा आग्रह असेल. विधान परिषदेत आम्हाला विनंती करावी लागेल. कारण तिथे आमचं बहुमत नाही. लोकायुक्त कायद्यामुळे पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना आम्ही विनंती करणार आहोत.
8 मार्चला आपण आर्थिर सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार आहोत आणि 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प साधर करु. आज चहापानावर बहिष्कार टाकताना विरोधकांनी तेच कारणं सांगितलं आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरदेखील तशीच प्रतिक्रिया आधीच टाईप केलेली असेल. पण त्यांनी आधी अर्थसंकल्प ऐकून घ्यावी.
मला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला विचारायचं आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिवस आहे. पण राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केलाय. आता तुमची नेमकी मजुरी काय? तुम्ही ज्यांची गळाभेट घेतात ते सावरकरांचा अपमान करतात. मी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करतो.
आपल्या बाजूचे जे तीनही देश आहेत, ज्या देशांमध्ये आपला कांदा जायचा त्या तीनही देशांची आर्थिक स्थिती चांगली नाही. निर्यातीकरता मार्केट उपलब्ध नाही आणि दुसरीकडे पीक अधिक आहे. याविषयी बरीच चर्चा झाली.
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. पण याप्रकरणी अतिशय वेगाने कारवाई करण्यात आली. पत्रकारांवर हल्ला विषयी जो कायदा आपण केला होता त्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
कायदा आणि सुव्यवस्थेविषयी, अशोक चव्हाण यांच्यावर पाळतबाबत बोलण्यात आलंय. याविषयी मी खोलात जाणार नाही. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी बद्दल आमच्या आयुक्तांना चौकशी करण्याचा आदेश दिला.
कधीकधी विनाकारण सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करतात. मनात येईल ती नावं घ्यायची आणि त्यातून राजकीय रंग द्यायचा हे योग्य नाही. आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा प्रयत्न, असं चाललं आहे. विरोधकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. त्यांना पुरेपूर सुरक्षा दिली जाईल. पण नरेटिव्ह तयार करण्याच्या प्रयत्नात चुकीची माहिती देण्यात येत असेल तर त्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री पोटनिवडणुकीच्या प्रचारात गेले तेव्हा फार पोटात दुखलेलं दिसत आहे. निवडणूक असल्याने प्रचार करणारच
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च झाला नाही, असं त्यांनी सांगितलं. प्रचाराला गेलो तरी 24 तास काम करतो.
विरोधी पक्षाने जरुर लोकहिताचे निर्णय मागावे.