शेतकरी कृषीमंत्र्यांसमोर ढसाढसा रडला, महाराष्ट्र सरकारची त्वरित मोठी कृती, नेमका दिलासा काय?
बुलढाण्यात एक शेतकरी कृषींमंत्री दादा भुसे यांच्यासमोर ढसाढसा रडला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेताच्या बांधावर जाऊन आज शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आज मोठी कृती केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झाले आहेत. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांच्या या वास्तविक परिस्थिती जगासमोर मांडणारी एक घटना आज घडली. बुलढाण्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज शेताच्या बांधावर गेले. यावेळी एक शेतकरी कृषीमंत्र्यांसमोर अक्षरश: ढसाढसा रडला. तर इतर शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तसेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर आज लगेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शेताच्या बांधावर पोहोचले. या सगळ्या घटनाक्रमानंतर महाराष्ट्र सरकारकडून एक खूप महत्त्वाची कृती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना तब्बल 177 कोटी रुपयांच्या निधीचं आज वाटप केलं आहे. राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पैशांच्या रुपाने मदत केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आज 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी प्रत्येक जिल्ह्याला वाटला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.
राज्यात 4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके आणि इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी :
अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग – ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग – ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर – ८४ कोटी ७५ लाख १९ हजार एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार