शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; संजय राऊत यांचा नेमका इशारा काय?
या मोर्चाच्या माध्यमातून आता रणनीती ठरली. रणशिंग फुंकले आहे आणि शंखही फुंकला आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. वज्रमुठ वळली आहे.
मुंबई: आजच्या या विराट मोर्चाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमिस केलं आहे. गव्हर्नर डिसमिस सांगणारा हा मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे, असा इशाराच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. महाविकास आघाडीने आज महामोर्चाचं आयोजन केलं होतं. या महामोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी हा इशारा दिला.
महापुरुषांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? यांना एक मिनिट सुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार उलथवून टाकण्याचा हा दिलेला हा इशारा आहे. आज दिल्लीही दुर्बिणीतून पाहत असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे. महाराष्ट्राची शक्ती काय आहे. आज महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आहे अन् महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा सर्वात मोठा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सरकार उलथवून टाकण्याची संधी आम्हाला कधी मिळतेय याची महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनता वाट पाहत आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
या मोर्चाच्या माध्यमातून आता रणनीती ठरली. रणशिंग फुंकले आहे आणि शंखही फुंकला आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. वज्रमुठ वळली आहे, असा इशाराही त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.
दरम्यान, आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला तुफान गर्दी झाली होती. या मोर्चात राज्याच्या कनाकोपऱ्यातून लोक आले होते. विशेष म्हणजे भाजप, मनसे आणि शिंदे गट वगळता सर्वच पक्षाचे लोक या मोर्चाला उपस्थित होते. आझाद मैदानात जणू वादळच निर्माण झालं होतं.
या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे पवार कुटुंबातील प्रमुख नेते उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील नेते आणि सदस्यही उपस्थित होते.