ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षा कपातीची बातमी खरी की खोटी? गृह विभागाकडून स्पष्टीकरण
ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची बातमी समोर आलेली. संबंधित बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर गृह विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. संबंधित बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईतलं राजकीय वातावरण सध्याच्या घडीला ढवळून निघालं आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. या दरम्यान अचानक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली. याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर गृह विभागाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे.
गृह विभागाचं नेमकं स्पष्टीकरण काय?
“शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2022 नुसार संबंधित मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येत आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरुक्षा देण्यात येत आहे. तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरुक्षा देण्यात येत आहे. तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तर तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट अशी सुरक्षा पुरविण्यात येत आहे”, असं गृह विभागाकाने म्हटलं आहे.
“संबंधित सुरक्षा वर्गीकरण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही”, असं स्पष्टीकरण विशेष सुरक्षा विभागाचे नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी दिलं आहे.
विनायक राऊत यांची टीका
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली. ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कमी केली तरी शिवसैनिक त्यांना पूर्णपणे सुरक्षा देतील, असं विनायक राऊत म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस सत्तेत असतानादेखील उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली नव्हती. पण भाजप सरकारने सुरक्षेत कपात केली. विशेष म्हणजे ठाण्यात नगरसेवक आणि त्याच्या पत्नीला सुरक्षा देण्यात येते. पण महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात येते. हा निंदणीय प्रकार आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सध्या सत्तेत असलेल्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेक कपात करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या देखील सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यावेळी देखील या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं होतं.