BREAKING | हालचाली वाढल्या, शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आठ आमदारांना विधीमंडळाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणात महत्त्वाच्या हालचाली घडण्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडत आहेत. तसेच निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु आहे.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना विधीमंडळाने नोटीस पाठवली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केलीय. याचबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील 8 आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला शरद पवार गटाकडून लवकरच उत्तर दाखल केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
विधीमंडळाकडून आत्तापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे. पण शरद पवार गटातील आमदार अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना नोटीस आलेली नाही. माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडून तटस्थ राहणं पसंद केल्याने त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
‘या’ आठ आमदारांना नोटीस
विधीमंडळाकडून अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आमदारांकडून रोखठोकपणे शरद पवार यांची बाजू मांडली जात आहे. त्यामुळे त्यांना विधिमंडळात प्रभावीपणे बाजू मांडता येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी कुणाची? याबाबत निर्णय कधी होणार?
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला. शिवसेना फुटीनंतर जशा घडामोडी घडल्या, अगदी तशाच घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. या लढाईत आता कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्यावर आधारुनच राज्यात आगामी काळात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.