MLA Disqualification | आमदार अपात्रतेबाबत आज मोठ्या घडामोडी, राहुल नार्वेकर कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार?
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून कानपिचक्या दिल्यानंतर राज्यात आता महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज या प्रकरणी महत्त्वाची सुनावणी घेणार आहेत.
मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज राज्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावेळी राहुल नार्वेकर हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या निर्णयावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे. आजच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी 4 वाजता ही सुनावणी होणार आहे. गेल्यावेळी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी 36 याचिकांना 6 गटात एकत्र करुन सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे या याचिकांबाबत अध्यक्ष आज काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज दोन महत्त्वाचे निर्णय
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दोन्ही गटांच्या याचिका एकत्र करणार आहे. म्हणजे या याचिका क्लब केल्या जाणार आहेत. हा एक महत्त्वाचा निर्णय आज होणार आहे. अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्याची छाननी करून या याचिका क्लब केल्या जातील. त्यानंतर अध्यक्ष आज नवीन टाईम टेबल जाहीर करण्याचा मोठा निर्णयही घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तसे निर्देश दिले होते. त्यानुसार हे दोन महत्त्वाचे निर्णय होतील. नार्वेकर हा नवीन टाईम टेबल सर्वोच्च न्यायालयात सादर करतील. त्यानंतर कोर्ट हा टाईम टेबल योग्य आहे की नाही हे 30 ऑक्टोबर रोजी ठरवतील. टाईम टेबल योग्य ठरल्यास त्यानुसारच पुढील सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाधिवक्त्यांशी चर्चा
दरम्यान, नवीन टाईम टेबल तयार करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हे कायदेशीर सल्ला घेणार आहेत. राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत चर्चा करून काही गोष्टी ठरवल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच विधानसभा अध्यक्ष या आठवड्यात दिल्लीलाही जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतही महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेऊन त्यांच्याशी कायदेशीरबाबींवर ते चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.