MLC Election 2022 : मतदान झालं, आता निकालाकडे लक्ष, कुणाचा निक्काल लागणार?; अवघ्या तीन तासात दूध का दूध पानी का पानी
MLC Election 2022 : शिवसेनेकडे 55 मते आहेत. दोन्ही उमदेवारांना मतदान केल्यानंतर शिवसेनेची हक्काची तीन मते अतिरिक्त होत आहेत. शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत.
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं (MLC Election 2022) मतदान पूर्ण झालं आहे. सर्वच्या सर्व 285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दहा जागांसाठीच्या या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी एकाचा निक्काल लागणार आहे. तर 10 जण विधान परिषदेत जाणार आहेत. मात्र, त्या आधीच पत्ता कुणाचा कट होणार याबाबतच्या वावड्या उठल्या आहेत. भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप (bhai jagtap) यांच्यात थेट लढत होती. या दोघांपैकी एकाचा पराभव होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (eknath khadse) हे भाजपच्या रडारवर होते. भाजप नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलं. त्यामुळे जगतापांऐवजी खडसे पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचा एक मावळा पडणार असं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत दगाफटका होणार का? अशी चर्चा सुरू झाली. दिवसभर या चर्चा सुरू होत्या. आता या सर्वांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. अवघ्या तीन तासात दूध का दूध पानी का पानी होणार असून या निवडणुकीत कुणाचा निक्काल लागणार हे स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेकडे 55 मते आहेत. दोन्ही उमदेवारांना मतदान केल्यानंतर शिवसेनेची हक्काची तीन मते अतिरिक्त होत आहेत. शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. राष्ट्रवादीकडे 51 मते आहेत. त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी एका मताची गरज आहे. पण संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार यांच्यासह काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत.
तर काँग्रेसकडे 44 मते असून दुसऱ्या उमेदवाराला विजयासाठी 8 मतांची गरज आहे. समाजवादी पार्टी आणि एमआयएमची प्रत्येकी दोन मतेही आघाडीलाच जाणार आहे. आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपकडे 106 मते आहेत. त्यांच्या पाचव्या उमेदवाराला 24 मतांची गरज आहे. भाजपला सहा अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपचे पाचवे उमदेवार प्रसाद लाड यांना अजून 18 मतांची आवश्यकता आहे.
किती जागांसाठी लढत?
विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त होत्या. पण भाजपने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने 11 उमेदवार मैदानात होते. त्यामुळे चुरशीची निवडणूक होत आहे.
मतमोजणी कधी?
आज सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
निकाल कधीपर्यंत येणार?
विधान परिषदेचा निकाला अवघ्या दोन तासात हाती येईल. मात्र, संपूर्ण निकाल तीन तासात म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत हाती येणार आहे.
किती आमदारांनी मतदान केलं?
एकूण 285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिंकण्यासाठी किती मते हवीत?
जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 26 मतांची गरज आहे.
मैदानात कोण कोण?
भाजप उमेदवार
1) प्रवीण दरेकर 2) राम शिंदे 3) श्रीकांत भारतीय 4) उमा खापरे 5) प्रसाद लाड
शिवसेना
1) सचिन अहिर 2) आमशा पाडवी
काँग्रेस
1) चंद्रकांत हंडोरे 2) भाई जगताप
राष्ट्रवादी
1) रामराजे नाईक निंबाळकर 2) एकनाथ खडसे