मुंबई | 1 जानेवारी 2024 : जुने वर्ष सरलं आहे. नवं वर्ष सुरू झालं आहे. देशच नव्हे तर जगभरातील नागरिकांनी नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. अनेकांनी तर चौपाट्या गाठून सरत्या वर्षाला निरोप दिला. नव्या वर्षाचे नवे संकल्पही केले आहेत. सामान्य लोकांनीच नव्हे तर राजकारण्यांनीही नव्या वर्षाचे संकल्प केले आहेत. कुणी हनुमान मूर्ती बसविण्याचा ध्यास घेतला आहे. तर कुणी सत्तेत येण्याचा संकल्प केला आहे. तसेच राजकारण्यांनी हे संकल्प करतानाच राज्यातील जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
एकनाथ खडसे – येणार नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या नव्या वर्षात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाव्यात हाच आमचा एकमेव संकल्प आहे.
खासदार रक्षा खडसे – माझा कोणीही व्यक्तिगत विरोधक नाही. आणि असला तरी त्यांनाही नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावं.
खासदार नवनीत राणा – 2024 मध्ये आम्ही आमच्या अमरावतीतील हनुमान गडीमध्ये देखील हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत. हाच नव्या वर्षाचा संकल्प आहे.
आमदार सचिन अहिर – मागचं सर्व विसरून नवीन जिद्दीने आणि जोमाने कामाला लागलं पाहिजे. येणाऱ्या वर्षात आम्ही उत्साहाने निवडणूक लढवणार आहोत.2024 हे वर्ष आमचं होईल अशी मतदार राजाला हाक देतो आणि विश्वास व्यक्त करतो.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – नवीन वर्षात सुद्धा आम्हीच सत्तेत राहणार. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल हाच आमचा संकल्प आहे.
नितेश राणे – माझं नवीन वर्ष हे हिंदू नववर्षा प्रमाणे आहे. उद्याची फक्त एक तारीख आहे. माझ्यासाठी गुढी पाडवा हीच नवीन वर्षाची सुरवात आहे. गुढी पाडव्याला जो संकल्प करीन तो वर्षभर राबवीन.
खासदार अमोल कोल्हे – नवीन वर्षात इंद्रायणी मेडिसीनचा प्रकल्प मार्गी लागावा आणि बिबट्या प्रवन क्षेत्रात दिवसा वीज देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
सतेज पाटील – निवडणुकीच हे येणार नवीन वर्ष देशासाठी महत्त्वाच असणार आहे. घटनेच्या आधारावर देश चालतो. मात्र ही घटनाच आता बाजूला ठेवली जातेय. बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोक या नवीन वर्षात विचार करतील अशी आशा आहे.
विहिंप नेते गोविंद शेंडे – नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन धिंगाणा करण्यापेक्षा दूध पिऊन साजरा करा.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन – नवीन वर्षाचा दुसरा कोणता संकल्प नाही. संकल्प फक्त राम मंदिर आणि पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरं काहीच नाही.