नंदकिशोर गावंडे, Tv9 मराठी, मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रावर गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस रुसून बसलेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. भर पावसाच्या मोसमात सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचं धस्स झालंय. ते आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी अतिशय मनापासून, जीव लावून पेरणी केलीय. आता पीकं थोडीशी मोठी झाली आहेत. ती डुलायला लागली आहेत. त्यांना आता पावसाची निंतात गरज आहे. अन्यथा ही पीकं पुन्हा कोमेजून जाण्याची भीती आहे.
पाऊस असाच रुसून बसला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकतो. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहे. गेल्या महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलं. अनेक नद्यांना पूर आला. पण काही जिल्हे पावसापासून उपेक्षित राहिले. त्यांना हवा तसा पाऊस यावर्षी मिळालेला नाही. त्यामुळे या भागांमधील शेतकरी आणि इतर नागरीक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पावसाचं नसणं हे खूप भीषण असतं. त्यामुळे पावसाने खूप पडावं. सर्व नद्या दुथडी भरुन वाहाव्यात अशी आशा असते. पण यावर्षी पाऊस हवा तसा होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारपुढील देखील आव्हानं वाढताना दिसत आहेत. याशिवाय पाऊसच पडला नाही तर अन्नधान्य कसं उगवेल? आणि महागाई किती वाढेल? हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे ही सर्व संकट उद्भवू नये म्हणून पावसाने पडायला हवं.
शेतकऱ्यांकडून देवाकडे पावसासाठी साकडं घातलं जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. खरं म्हणजे ही अपडेट निराशा करणारीच आहे. पण राज्यात आता पाऊस कधी येऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यासाठी पुढचे दोन आठवडे जास्त आव्हानात्मक असणार आहेत. कारण दोन आठवडे पावसाची शक्यता फार कमी आहे.
राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास सध्या फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे. 19 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सध्या सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे.
17 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. राज्यात या काळात सर्वदूर मोसमी पाऊस विश्रांती घेईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढून 18 किंवा 19 ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 25 ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे हवामान विभागाचे वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर पावसाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड येथे पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सरासरी इतका, किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे.