Maharashtra Rain | पाऊस महाराष्ट्रात पुन्हा कमबॅक करणार, मुसळधार कोसळणार, पुढचे 5 दिवस महत्त्वाचे
पाऊस पुन्हा महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाचे असणार आहेत.
मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने आराम घेतलाय. सलग दोन आठवडे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोसळल्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. पण आता पाऊस पुन्हा कोसळणार आहे. राज्यात पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधात पावसाची शक्यता आहे.
जुलै महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यात चांगला पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडला. याशिवाय पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, नालासोपारा येथे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. तसेच मुंबईतही तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडला. पण दोन दिवसांपासून पावसाने आराम घेतला आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस कधी पोहोचेल? अशी चिंता व्यक्त केली जात होती. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
“बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झालंय. संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. नंतर, पुढील 24 तासांत Gangetic West Bengal ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे”, असं के एस होसाळीकर यांनी आज ट्विटरवर सांगितलं आहे.
महाराष्ट्रात अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हवा तसा नाही
महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, चंद्रपूर, पालघर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पण अजूनही काही जिल्ह्यांमध्ये हवा तसा पाऊस पडलेला नाही. नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवा तसा पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे तिथले शेतकरी अजूनही पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार?
जुलै महिन्यात पावसाने काही ठिकणी रेकॉर्ड मोडले असले तरी ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण तरीही पाऊस पडणार नाही, असं होणार नाही. पुढचे तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.