महाराष्ट्रात डोळे येणे आजाराचं अक्षरश: थैमान, तब्बल 2 लाख 88 हजार 703 रुग्ण
महाराष्ट्रात डोळ्यांच्या साथीने अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यभरात आता जवळपास 2 लाख 88 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालंय. महाराष्ट्र शासनाकडून जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत 2 लाख 88 हजार 703 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 35 हजार 466 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात 16 हजार 105 रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात 14 हजार 96 रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात 12 हजार 290 रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात 12 हजार 134 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत 1882 रुग्णांची नोंद झालीय.
महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे.