MARD Doctors Strike मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज डॉक्टर संपावर आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयाबाहेर मार्डच्या निवासी डॉक्टरांचा संप सुरु केला आहे. जोपर्यंत, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मार्ड डॉक्टर संपावर ठाम आहेत.
शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन अनेक महिने उलटले. तरीही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे मार्डचे डॉक्टर संतप्त आहेत. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. या संपामुळे रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्या, पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदवुत्तर अभ्यासक्रमाची फी माफी आदी मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या होत्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सेंट्रल मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने निवासी डॉक्टरांनी पुन्हा संपाचा इशारा दिला होता.
निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला या मागण्यांविषयीचे स्मरणपत्र सादर केले होते. आपल्या मागण्यांविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती या स्मरणपत्रातून मार्डने राज्य शासनाला केली होती. तसेच याबाबत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत तात्काळ निर्णय न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय मागण्या लेखी स्वरुपात मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे. कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेली सेवा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप फी माफीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचे स्पष्ट केले.
निवासी डॉक्टर जवळपास दीड वर्ष करोना सेवेमध्ये आहेत. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. आज साडे अकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सोबत पुन्हा बैठक होणार आहे.
लातूर- विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचा संप सुरू आहे. मार्ड संघटनेने एक दिवसाचा संप पुकारला आहे. कोव्हिड भत्ता मिळाला पाहिजे, शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी एक दिवसाचा संप करण्यात येत आहे. अत्यावश्यक वार्डातील डॉक्टर वगळता 58 डॉक्टर संपामध्ये सहभागी झाले आहेत.
संबंधित बातम्या
राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप, मागण्या मान्य न झाल्याने घेतला निर्णय
मार्डच्या प्रतिनिधीसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख चर्चा करणार असल्याची माहिती. आज सकाळपासून सुरू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाला मिळणारा पाठिंबा पाहता राज्य सरकार निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती. निवासी डॉक्टर संपावर गेल्याने पडत असलेल्या रुग्णसेवेवरील ताण पाहता संप मागे घ्यावा अशी वैद्यकिय शिक्षण विभागाकडून विनंती. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मार्ड डॉक्टर संपावर ठाम आहेत.