विशेष अधिवेशनाची तयारी ते मंत्रालयात गर्दीमुळे मोबाईल नेटवर्क जाम, महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या तीन मोठ्या बातम्या
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. यातील काही घडामोडींची माहिती समोर येत आहे. राज्य सरकार आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यासाठी आज महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडीसुद्धा घडत आहेत. विशेष म्हणजे आज महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तर तिसरी बातमी देखील तितकीच महत्त्वाची आहे. राज्य सरकार आगामी विधानसभा निवडणुकीआधी विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच विधान परिषदेच्या सभापतींची निवड देखील या विशेष अधिवेशनात करण्याची सरकारचा प्लॅन आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सरकारची विशेष अधिवेशनाची तयारी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत विधीमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत विशेष अधिवेशन घेण्याबाबतची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्य सरकार सभापती निवड, शेतकरी कर्जमाफी आणि मराठा आरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. तीन मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन घ्यावं का? या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रालयात उसळली गर्दी, मोबाईल नेटवर्क जाम
मंत्रालयात आज मोठी गर्दी झाली. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क नसल्याचा प्रकार बघायला मिळाला. मंत्रालयाच्या सगळ्याच मजल्यांवर आज गर्दी बघायला मिळाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात गर्दी होती, अशी माहिती समोर येत आहे. पण त्याचा फटका मोबाईल नेटवर्कला बसला. मंत्रालयात सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या सिमकार्डला आज नेटवर्क नव्हतं.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय :
- पशुसंवर्धन विभाग : राज्य सरकार “राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम आता थेट बँक खात्यात जमा करणार.
- सार्वजनिक आरोग्य विभाग : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिलं जाणार. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयांची मदत केली जाणार
- मदत व पुनर्वसन विभाग : शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार
- सामान्य प्रशासन विभाग : दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण
- सामान्य प्रशासन विभाग : बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर देणार
- महसूल विभाग : अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन