2024 Election MVA Seat Allocation | महाविकास आघाडीचं लोकसभेसाठीचं जागावाटप जवळपास निश्चित, कोणता पक्ष किती जागा लढणार?
maha vikas aghadi lok sabha election 2024 seats | देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विशेष म्हणजे पडद्यामागे प्रचंड हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. या दरम्यान महाविकास आघाडीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचं लोकसभेसाठी जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. महाविकास आघाडीचं लोकसभेच्या 44 जागांवर बोलणी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ठाकरे गट 19 ते 21, काँग्रेस 13 ते 15 जागा, आणि शरद पवार गट 10 ते 15 जागा लढण्याची शक्यता आहे. 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास अकोल्याची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शेट्टी सोबत न आल्यास शरद पवार गट या जागेवर निवडणूक लढवणार आहे. जालना, हिंगोली, भंडारा-गोंदिया, अमरावती जागेचा तिढा चर्चेतून सोडवणार आहेत. भंडारा-गोंदियाची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात चर्चेतून ठरेल. तर अमरावतीची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेतून ठरेल.
अंतिम निर्णय लवकरच होणार
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली होती. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली होती. 44 जागांवर बोलणी पूर्ण झालीय. पण 4 जागांवर बोलणं सुरु आहे. काँग्रेस नेते 5 राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला निकाल आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन या जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
शिवसेना आणि भाजप 2019 च्या लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. या निवडणुकीत 23 मतदारसंघातून शिवसेना आणि 25 मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता ठाकरे गट महाविकास आघाडीतून 19 ते 21 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मविआचं संभाव्य जागावाटप
- मुंबईत उद्धव ठाकरे गट 4 जागा लढण्याची शक्यता
- मुंबईतून काँग्रेस 2 जागा लढण्याची शक्यता
- द. मुंबई, द. मध्य, ईशान्य मुंबई ठाकरे गट लढण्याची शक्यता
- उत्तर पश्चिम मुंबईची जागा उद्धव ठाकरे गट शक्यता
- उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबईची जागा काँग्रेस लढण्याची शक्यता