उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले विरुद्ध देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे?
एखाद्या कार्यक्रमात शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं काही नवीन नाही
मुंबई : महाविकास आघाडी विरुद्ध नवी युती तयार होते की काय, असं चित्र निर्माण झालंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत मनसेची जवळीक वाढली आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे अशा नव्या महायुतीची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले विरुद्ध देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे. आता महाविकास आघाडी विरुद्ध नवी महायुती असेल का, असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे हल्ली शिंदे, फडणवीसांसोबत राज ठाकरे यांची जवळीकता वाढली आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात राज ठाकरे यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. त्यामुळं नव्या महायुतीची नांदी आहे का, अशी चर्चा सुरू झाली. आम्ही विचार, ध्येय एकच आहे. त्यामुळं गैर आहे, असं समजण्याचं कारण नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं, असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात. शिंदे गटाकडूनसुद्धा कोणतीही अडचण नाही, असं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.
एखाद्या कार्यक्रमात शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं काही नवीन नाही. पण, गेल्या काही दिवसांतल्या भेटीगाठी वाढल्यात. फडणवीससुद्धा राज ठाकरे यांच्या घरी येतात. शिंदेही राज ठाकरे यांच्या घरी येतात. राज ठाकरेही शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर जातात. त्यामुळं नव्या समीकरणाच्या या दृष्टिकोनामधूनचं पाहिलं जातंय.
आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी तिघेही एकत्र लढतील, अशी शक्यता आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला तोड म्हणून भाजप, शिंदे गट मनसेची महायुती होऊ शकते. भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला एकत्र यावं लागेल, हे महाविकास आघाडीचे नेते उघडपणे सांगतात. भाजप, शिंदे गट आणि मनसे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मैदानात उतरू शकतात.