शपथविधीचा फॉर्म्युला अखेर ठरला, शिंदे आणि अजितदादा गटात कोण वरचढ?; दिल्लीवारी, नाराजी कुणासाठी लाभदायक?
Mahayuti Cabinet Extended Formula Final : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले आहेत. तर एकनाथ शिंदे हे राज्यातच आहेत.
महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तारूढ झाले आहे. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ताणली. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मंत्रिमंडळाला अंतिम रूप देण्यासाठी फडणवीस आणि पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. सहा आमदारांमागे एक मंत्री अशा फॉर्म्युलावर सहमती होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही नेते चर्चा करणार आहेत.
फडणवीस-अजितदादा दिल्लीत
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर एकनाथ शिंदे हे ठाण्यात आहेत. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्यांच्या काही मंत्र्यांबाबत अजून एकमत झाले नसल्याचे समोर येत आहे. तर गृहमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते दिल्लीला गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कधी होणार विस्तार?
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला जवळपास निश्चित झाला आहे. आज अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली. बहुतेक 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती त्यांनी दिली. या दिवशी 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे यांची नाराजी दूर?
दरम्यान एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला गृहखात्यासह महसूल खाते पण देण्यात येणार नाही तर नगरविकास मंत्रालय देण्यात येईल असे कळते. या फॉर्म्युलानुसार भाजपाला 15 ते 16 मंत्रीपदं मिळू शकतात. तर शिंदे सेनेला 8 अथवा 9 आणि अजित दादा गटाला 8 किंवा 9 मंत्रीपदं मिळू शकतात. पहिले मंत्रिमंडळ हे 32 ते 43 जणांचं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात 16 डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच महायुतीचे मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत नाहून निघणार असल्याचे सांगीतले जात आहे. आज अजितदादांनी 14 डिसेंबर रोजीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा दुजोरा दिला आहे.