BIG BREAKING | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या, सत्ताधारी पक्षांच्या सर्व आमदार-खासदारांची बैठक सुरु
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार-खासदार उपस्थित आहेत. या बैठकीत अतिमहत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. पण त्याआधी राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला सत्ताधारी तीनही पक्षांचे सर्व आमदार आणि खासदार आले आहेत. राज्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. राज्यभरातील हजारो गावांनी लोकप्रतिनिधींसाठी गावबंदी केलीय. तर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आमदारांचे घरे, गाड्या, कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. या घडामोडींमुळे आमदार आणि खासदारांमध्ये देखील धास्ती भरली आहे. त्यामुळे या बैठकीत याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मराठा आंदोलनामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती निर्माण झालीय, याबाबत चर्चा होणार आहे. तसेच कमी पाऊस पडलेल्या तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘या’ मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता
सत्ताधारी तीनही पक्षांचे सर्व आमदार-खासदार या बैठकीत हजर आहेत. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणासोबत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेणं अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात विधी मंडळाचं हिवाळी अधिवेश देखील असणार आहे. त्यामुळे या बैठकीत आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढच्या महिन्यात विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात कोणकोणते मुद्दे मांडायचे, विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांवरुन त्यांना चितपट कसं करायचं, कोणते मु्द्दे मांडायचे, या विषयांवर देखील आजच्या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.