Mahesh Shinde : एकनाथ शिंदे हे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना आमदार महेश शिंदेंचं वक्तव्य
आम्ही तक्रार करायचो, ते दुर्लक्ष करायचे. आदिवासी विभागाचा निधी 800 कोटींचा निधी परस्पर वाटून घेतला. वीज दरवाढीबाबत आम्ही आंदोलन केले. मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक फोनही केला नाही. एकनाथ शिंदेंनी दखल घेतली, असे महेश शिंदे म्हणाले.

मुंबई : अडीच वर्षानंतर माजी मुख्यमंत्री भेटले. मला खूप आनंद झाला. माजी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा. आमच्याकडे जास्त आमदार, जिल्हाप्रमुख, त्यामुळे एकनाथ शिंदे हे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, असे वक्तव्य आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री केला आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट शिवसेनेचे पक्षप्रमुखच महेश शिंदे यांनी करून टाकले. ते म्हणाले, की ज्या दिवशी आमची उपनेत्यांची बैठक झाली, एकमुखाने पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली. यावेळी महेश शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. केवळ खजिना लुटण्याचे काम केले, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
‘केवळ खजिना लुटण्याचे काम केले’
महेश शिंदे म्हणाले, की संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत खणखणीत नव्हती. माझा प्रश्न आहे, की तुम्ही आजारी होतात, तर तुमच्या जागी आदित्य ठाकरे होते, कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी काय केले. केवळ खजिना लुटण्याचे काम केले. राजपुत्र साथ देत होता, अशी टीका त्यांनी केली.
‘आम्ही स्टे मागितला’
अजित पवारांनी औंध येथे खासगी संस्थांच्या विहिरीला 39 कोटी रुपये दिले. तिथे असे काय आहे? गैरव्यवहार होत होता… कोरोना काळात जनतेला काय दिलं? राज्य सरकारने त्यावेळी पैसे नसल्याचा कांगावा केला. 70 कोटी गावाच्या विकासाला दिले. आदित्य ठाकरेंच्या विभागातले पैसे दिले. आम्ही स्टे मागितला असल्याची माहिती त्यांनी दिली.



‘एक फोनही केला नाही’
आम्ही तक्रार करायचो, ते दुर्लक्ष करायचे. आदिवासी विभागाचा निधी 800 कोटींचा निधी परस्पर वाटून घेतला. वीज दरवाढीबाबत आम्ही आंदोलन केले. मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक फोनही केला नाही. एकनाथ शिंदेंनी दखल घेतली. मनाला वाटेल तसा निधी वाटला गेला, मुख्यमंत्री लक्षच देत नव्हते. मात्र आता शिंदे यांनी राज्याचा चांगला विचार केला, राज्याच्या तिजोरीचा पैसा आता सुरक्षित आहे, असे महेश शिंदे म्हणाले.
‘दोघेही सरकार चालवू शकतात’
जयंत पाटलांवर टीका करताना ते म्हणाले, की जयंत पाटील यांची अवस्था भरल्या ताटावरून उठवलेल्या व्यक्तीसारखी झाली आहे. म्हणूनच ते आरोप करतात. मंत्रिमंडळ विस्तार नाही झाला तरी काही फरक नाही, आम्हाला काही त्रास होत नाही, दोघेही सरकार चालवू शकतात, यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवाल महेश शिंदे यांनी केला आहे.