Manoj Jarange : राज्यात कुणाचा होणार सुपडा साफ, मुंबईतील इतक्या जागांवर खेला होबे; मनोज जरांगे पाटील यांची ताकद तरी किती?
Manoj Jarange Assembly Election : मराठा आरक्षणाच्या नाराजीचा फटका राजकीय पक्षांना बसला. विशेषतः महायुतीला त्याची अधिक झळ बसली. या मुद्यावर अजून ही खल सुरू आहे. आत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईसह राज्यात 'खेला होबे' चा नारा दिला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अनेक पक्षांनी त्यासाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभेचे कवित्व संपले ना संपले तोच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. आता अनेक राजकीय पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी यात्रेचा आयोजन केले आहे. विविध राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. अनेक भागात पक्षीय दौरे सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर पुन्हा अनेक नेते सक्रिय झाले आहेत. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा ताकद दाखवण्याचा इशारा दिला आहे. आता जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुफडा साफ करण्याचा विडा उचलला आहे.
तर 288 विधानसभांवर उमेदवार
राज्यात गेल्या सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला, निवळला आणि पुन्हा चिघळला आहे. हा आता सामाजिकच नाही तर राजकीय मुद्दा ठरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. पण अद्याप राज्य सरकारने त्यावर ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. आता सर्वपक्षीय बैठकीचं गुऱ्हाळ सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर जरांगे पाटील उमेदवार उभे करण्याची चाचपणी करत आहेत.
तीन प्रदेशात सुफडा साफ
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण हा मोठा फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मोठा दणका देण्याची तयारी सुरु केली आहे. या भागात सुफडा साफ होईल, असा इशारा त्यांनी दिला. अर्थात हा इशारा सत्ताधाऱ्यांना आहे, हे वेगळं सांगायला नको. जरांगे पाटील सध्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रानंतर आज नाशिक दौऱ्यावर आहेत.
मुंबईत खेला होबे
जरांगे पाटील यांच्या मते, मुंबईत मराठा समाजाचा टक्का हा जवळपास 17 ते 18 टक्के इतका आहे. मुंबई आणि आसपास 19 ठिकाणी ते उमेदवार उभे करणार आहेत. याठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून नाही आला तरी 19 जागांवर मोठा उलटफेर होण्याचा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारला मुंबईत मोठा झटका देण्याच्या तयारीत ते आहेत.
29 ऑगस्टला महत्वाची बैठक
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. जर मराठा समाजाची मागणी यावेळी मान्य झाली नाही तर राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सध्या मराठा समाजाची परीक्षेची वेळ आहे. आता 29 ऑगस्टला मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे. त्यात जो निर्णय घेण्यात येईल, तो मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.